शिर्डी - जम्मू-कश्मीरमध्ये शांतता असून तेथे पर्यटकांसह नागरिकांना कोणताही धोका नाही. आता काश्मीरमध्ये दगडफेकीच्या घटनाही बंद झाल्या आहेत, दहशतवाद्यांची भरतीही बंद झाली. त्यामुळे दहशतवाद्यांची लढाई सरकारशी आहे, पर्यटकांशी नाही, असे प्रतिपादन जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केले. दहशतीच्या माध्यमातून काहीही मिळणार नसल्याची बाब दहशतवाद्यांच्या लक्षात आली आहे. त्यामुळे चर्चेतूनच प्रश्न सोडवावे लागतील असे दहशतवाद्यांच्या लक्षात आल्याचेही ते म्हणाले.
जम्मू-कश्मीर बँकेच्या शिर्डीतील शाखेचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी मलिक बोलत होते.
पुढे बोलताना मलिक म्हणाले, की जम्मू-कश्मीर बँक अतिशय चांगले काम करत आहे. मध्यंतरी काही गडबड आढळून आली होती, त्यात बँकेचा कोणताही दोष नव्हता. भारतात कोणतीही व्यवस्था निर्माण करा, राजकारणी काहीना काही 'घफला' करतात. मात्र ग्राहकांना चिंता करण्याची गरज नाही. ज्या लोकांनी घोळ घातला, त्यांना चिंता करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
जम्मू-कश्मीर आणि बँकेबाबत लोकांमध्ये गैरसमज आहेत. जम्मू-कश्मीर बँकेत आपण चांगली गुंतवणूक करावी, या बँकेला उर्जीत अवस्थेत आणावे, बँक चांगल्या स्थितीत आली तर जम्मू कश्मीर भारताचा भाग असल्याचा संदेश तुम्ही तेथील जनतेला देता, असा विश्वास सत्यपाल मलिक यांनी व्यक्त केला. काश्मीरमधील दहशतवाद्यांची लढाई सामान्य जनतेशी आणि पर्यटकांशी नाही. ती लढाई सरकार आणि दहशतवाद्यांमध्ये आहे. दहशतवादी सर्वसामान्य लोकांना त्रास देत नाहीत, हे त्यांचे चांगलच काम असल्याचेही ते म्हणाले.
साईचरणी झाले नतमस्तक
शिर्डी येथील साईबाबा मंदिरात जाऊन राज्यपाल मलिक यांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले, तर न मागता सगळे मिळते असे यावेळी ते म्हणाले.