अहमदनगर- महाविकासआघाडी सरकारने दूध दरवाढीवर बैठका घेतल्या असून लवकरच निर्णय अपेक्षित आहे. मात्र याचे श्रेय घेण्यासाठी भाजप राजकारण करत असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. तसेच श्रेयाचे राजकारण करणारे राज्यातील भाजप नेते केंद्राच्या दूध भुकटी आयात निर्णयावर आणि इंधन दरवाढीवर गप्प का, असा सवालही उपस्थित केला आहे.
राज्यात 1 ऑगस्टपासून विविध शेतकरी संघटनासह भारतीय जनता पक्षाने दुधाला दरवाढ मिळावी यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. मागील आठवड्यात पण भाजपच्या वतीने राज्यभर या मागणीवर आंदोलने करण्यात आली होती. याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
एकीकडे दूध दरवाढीवर राजकारण करत आंदोलनाची भाषा करणारे राज्यातील भाजप नेते केंद्र सरकार 15-20 टन दूध पावडर आयात का करते, पेट्रोल-डिझेलचे भाव का वाढत आहे, यावर केंद्राला सवाल करत नाही. किंवा आंदोलने करत नाही. महाविकासआघाडी सरकार हे जनतेचे, शेतकऱ्यांचे सरकार आहे, दूध दरवाढीवर लवकरच मार्ग निघेल, असा विश्वास रोहित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.