मुंबई - अहमदनगर येथील महिलेसह तिच्या पतीलाही विवस्त्र करून मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर या घटनेचा व्हिडिओ करून तो समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आला आहे. या घटनेच्या तपासासाठी एक आयपीएस दर्जाच्या महिला अधिकाऱ्याची नेमणूक करून एका महिन्यात चौकशी पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
विधान भवन परिसरात माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, यापूर्वीही अशा प्रकारच्या सात घटना घडल्या होत्या. पण, त्यामध्ये तथ्य निघाले नव्हते. अहमदनगरच्या या घटनेमध्ये पीडितेने ज्यांच्याविरोधात तक्रार केली त्या तिच्या कुटुंबातील व्यक्ती जरी असल्या तरी चौकशीनंतर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे मंत्री देशमुख म्हणाले.
काय आहे प्रकरण ?
सामूहिक बलात्काराची फिर्याद मागे घेण्यासाठी पीडित महिलेसह पतीलाही बांधून विवस्त्र करून पेट्रोल टाकून अमानुष मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना शहरात घडली होती. या प्रकरणी पीडिता आणि पतीला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या 2 अज्ञात पोलिसांसह एकूण 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सन 2016 मध्ये अत्याचार होऊन अद्याप न्याय न मिळालेल्या पीडितेस आणि तिच्या पतीला विवस्त्र करत अंगावर पेट्रोल टाकत अमानुषपणे मारहाण करणाऱ्या एकूण १० आरोपींविरोधात अहमदनगर पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला.
हेही वाचा - हे कायद्याचे राज्य आहे का.. ? बलात्कार पीडितेला पतीसह विवस्त्र करून अमानुष मारहाण, अंगावर ओतले पेट्रोल