शिर्डी : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 7 जुलै रोजी शिर्डीत साईबाबांच्या समाधीला भेट दिली होती. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी साईबाबा संस्थानच्या साई प्रसादालयात भोजनाचा अस्वाद घेतला होता. राष्ट्रपतींसाठी खास जेवण साई संस्थानच्या दोन आचाऱ्यांनी बनवले होते. या दोन्ही आचाऱ्यांना आज राष्ट्रपती भवनातून खास जेवण बनवण्यासाठी निमंत्रण मिळले आहे. त्यासाठी दोघेही दिल्लीला जाणार आहेत.
राष्ट्रपतींना मराठमोळ्या जेवणाची भुरळ : या दोन्ही आचाऱ्यांनी अतिशय चविष्ट मराठमोळे पदार्थ तयार केले होते. मराठी जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जेवण उत्कृष्ट असल्याचे सांगितले होते. त्याचबरोबर मुर्मू यांच्यासाठी बनवण्यात आलेल्या शेंगदाणा चटणीबाबतही त्यांनी सोबत असलेल्या स्वयंपाकींना माहिती घेण्याची विनंती केली होती. यावरुन राष्ट्रपती महोदयांना साई प्रसादालयात केलेल्या मराठमोळ्या जेवणाची जणु भुरळच पडली आहे, असे दिसते.
आचारी होणार दिल्लीला रवाना : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती भवनातील एका अधिकाऱ्याने थेट साई संस्थानच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत दोन्ही आचाऱ्यांना दिल्लीत बोलवले आहे. मराठमोळे जेवण बनवण्यासाठी राष्ट्रपती भवनात या दोघांना शनिवारी पाठवण्यात येणार आहे. यासाठी राष्ट्रपती भवनाने दोघांचेही विमानाचे तिकिट बुक केले असून दोघेही उद्या २९ जुलै रोजी विमानाने दिल्लीला रवाना होणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी 'ई टीव्ही भारत'ला दिली आहे. साई संस्थानचे आचारी आता राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपतींसाठी चविष्ठ जेवण बनवणार आहेत. राष्ट्रपती भवनात दोघेही आचारी खास महाराष्ट्रीयन पदार्थ, विशेषत: शेंगदाण्याची चटणी शिकवणार असल्याने शिर्डीसह परिसरात मोठा आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 7 जुलै रोजी शिर्डीला भेट देऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले होते. साई दर्शनानंतर संस्थानच्या आशियातील सर्वात मोठ्या साई प्रसादालयात मुर्मू यांच्या जेवणाची व्यावस्था करण्यात आली होती. त्यांच्या जेवणाची व्यवस्था साई प्रसादालयाचे आचारी रवींद्र वहाडणे, प्रल्हाद कर्डिले यांच्याकडे सोपविण्यात आली होती. या दोघांच्याही हाताचे जेवण राष्ट्रपती महोदयांना आवडल्याने त्यांना दिल्लीला बोलवण्यात आले आहे.