राहुरी (अहमदनगर) - तुरीच्या आद्यरेखा प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विद्यापीठाने विकसीत केलेले तुरीचे वाण आणि तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतावर पोहचविण्यास चांगल्या प्रकारे मदत झाली आहे. विद्यापीठाने विकसित केलेल्या वाणांमुळे शेतकऱ्यांचे तुरीचे उत्पन्न व उत्पादकतेत वाढ होत असल्याचे पाहून समाधान वाटत असल्याचे कडधान्य सुधार प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार कुटे यांनी सांगितले. ते कडधान्य सुधार प्रकल्पाच्या कार्यक्रमात बोलत होते.
महात्मा फुले कृषि विद्यापीठातील कडधान्य सुधार प्रकल्पात तुरीची आद्यरेखा प्रात्यक्षिके राबविण्यात आले. यामध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना कामगंध सापळे, ल्युर, हेलिओकिल व कडधान्य पुस्तके यांचे वाटप करण्यात आले.
शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना किटकशास्त्रज्ञ डॉ. चांगदेव वायळ म्हणाले, की कडधान्ये पिकांमध्ये सर्वात जास्त किडींचा प्रादुर्भाव हा तूर या पिकावर आढळून येतो. असे असले तरी कमीत कमी खर्चामध्येदेखील आपण तुरीवरील किडींचे व्यवस्थापन व नियंत्रण चांगल्या प्रकारे करू शकतो. तुरीवर 200 पेक्षा जास्त किडींचा प्रादुर्भाव झाल्याची नोंद आढळून आली आहे. किडींच्या प्रादुर्भावामुळे तुरीच्या उत्पन्नात 30 टक्यांपर्यंत घट येवू शकते. असे जरी असले तरी तुरीचे सर्वात जास्त नुकसान करणाऱ्या किडींची संख्या ही फक्त 4 ते 5 आहे. त्यांचा प्रादुर्भाव हा तुरीला फुलकळी लागल्यापासून ते शेंगा पिकेहोईपर्यंत आढळून येतो. त्यामध्ये प्रामुख्याने शेंगा पोखरणारी अळी, पानाफुलांची जाळी करणारी अळी, पिसारी पतंगाची अळी व शेंगमाशी या किडींचा समावेश आहे.
असे करावे किडींचे व्यवस्थापन-
- किडींच्या व्यवस्थापनासाठी व प्रभावी नियंत्रणासाठी तुरीला फुलकळी लागण्याच्यावेळी 2 कामगंध सापळे व 20 पक्षीथांबे प्रती एकरी लावावेत.
- प्रतिबंधात्मक उपाय म्हणून 5 टक्के निंबोळी अर्काची पहिली फवारणी करावी.
- पीक 50 टक्के फुलोऱ्यावर असताना एच. ए. एन. पी. व्ही. 500 एल ई (1 x 109 तीव्रता) 2 मि. ली. प्रती लिटर पाणी या प्रमाणात दुसरी फवारणी करावी.
- जर किडींनी आर्थिक नुकसानकारक पातळी ओलांडली असेल तरच इंडोक्झाकार्ब 14.5 टक्के प्रवाही 0.7 मि. ली. किंवा इमामेक्टीन बेंझोएट 5 टक्के दाणेदार 0.4 ग्रॅम किंवा क्लोरान्ट्रानीलीप्रोल 18.5 टक्के प्रवाही 0.3 मि. ली. प्रती लिटर पाणी या प्रमाणात वरीलपैकी कोणत्याही एका किटकनाशकाची सकाळी लवकर फवारणी करावी.
- किटकनाशकांची फवारणी करत असतांना फवारणीचे कीट परिधान करावे.
- फवारणीचे द्रावण हे तुरीच्या झाडाच्या सर्व भागावर व्यवस्थितपणे पडेल याची काळजी घ्यावी.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोगशास्त्रज्ञ डॉ. विवेक शिंदे यांनी केले. मका तूर रोगशास्त्रज्ञ डॉ. विश्वास चव्हाण यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला राहुरी, नेवासा व नगर तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.