अहमदनगर - जामखेड तालुक्याचे नायब तहसीलदार नवनाथ लांडगे यांनी कर्जत रस्त्यावर वाळूसह भरलेला ट्रक पकडून तहसील कार्यालयात आणला. मात्र, काही वेळानंतर वाळूतस्करांनी तो ट्रक तहसील कार्यालयातून पळवल्याचा प्रकास समोर आला आहे. ही चार महिन्यातील दुसरी घटना आहे.
नायब तहसीलदार नवनाथ लांडगे हे पोलीस पथकासोबत कारवाईसाठी बाहेर पडले होते. त्यांना कर्जत रस्त्यावर एक ट्रक वाळूची वाहतूक करताना आढळला. संबंधित ट्रक थांबवून त्यांनी तहसील कार्यालयात आणला. यानंतर संबंधित ट्रकवर कारवाईची प्रक्रिया सुरू होती. मात्र, या दरम्यान वाळूतस्करांनी गेट तोडून वाळूचा ट्रक तहसील कार्यालयातून पळवला.
याबाबत नायब तहसीलदार यांनी प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांना संबंधित घटनेची माहिती दिली व वाळू तस्करांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.