अहमदनगर - पाथर्डी तालुक्यातील जवळा गावातील बसस्थानक परिसरात पानटपऱ्यांमध्ये बेकायदेशीर गांजा विकला जात आहे. गांजा शेती करणे तसेच गांजाच्या विक्रीसह वाहतूक करणे हा गुन्हा असून, संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाते. मात्र, जवळा येथे चक्क बेकायदेशीर गांजालाही नाव देण्यात आले आहे. या ठिकाणी साधारण बेकायदेशीर गांजा महागड्या किंमतीत विकला जात आहे. मात्र, दुकानदारांवर पोलिसांनी अजून कारवाई केलेली नाही.
गांजाबरोबर तंबाखू ,गुटखा, मावा सुद्धा मोठ्या प्रमाणात टपऱ्यांमध्ये विकला जातो. दररोज सकाळी टपऱ्यांवर सिगारेट, गांजा, गुटखा, तंबाखू, नशेची सुगंधी सुपारी घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडते. हे तंबाखू खाणारे तिथेच थुंकतात. त्यामुळे कोरोना रोगाचा प्रसार होण्याची भीती निर्माण झाली आहे. हॉटेल बाहेरच प्रवेशाच्या ठिकाणी थुंकीच्या पिचकाऱ्या मोठ्या प्रमाणात दिसतात.
त्यामुळे कोरोनाच्या प्रसाराचा धोका लक्षात घेता, स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पाथर्डी पोलिसांनी या अवैध गांजा-तंबाखू विक्रीवर कारवाई करावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे. जवळा बसस्थानक परिसरात ठिकठिकाणी थुंकण्यास बंदीचे फलक लावण्याची मागणी लोकजागृती सामाजिक संस्था करत आहे.