अहमदनगर - सुजय विखे-पाटील यांचे भारतीय जनता पक्षाने स्वागत केले आहे. त्यामुळे मलाही ते करणे क्रमप्राप्त आहे. लोकसभा निवडणुकीबाबतची माझी भूमिका मी योग्य वेळी स्पष्ट करेल, असे वक्तव्य करुन अहमदनगर भाजपमध्ये सारेच आलबेल नसल्याचे संकेत खासदार दिलीप गांधी यांनी दिले आहेत.
काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे-पाटली यांना दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी हवी होती. ती मिळणे शक्य नसल्याने त्यांनी मंगळवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या मतदारसंघातून सध्या भाजपकडून दिलीप गांधी हे विद्यमान खासदार आहेत. विखेंना भाजपकडून उमेदवारी दिली जाईल, असे वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे. त्यामुळे गांधींचा पत्ता काटला जाण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर गांधी काय भूमिका घेतात हे महत्वाचे मानले जात आहे.
तूर्तास दिलीप गांधी यांनी सावध भूमिका घेतली आहे. पक्षाच्या निर्णयाचे स्वागत करत त्यांनी सुजय विखेंचा पक्ष प्रवेश मान्य केला आहे. पण, विखेंना उमेदवारी देण्याबाबतच्या मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर काहीही प्रतिक्रिया देण्याचे त्यांनी टाळले आहे. हा त्यांचा निर्णय आहे, माझी भूमिका मी योग्य वेळी स्पष्ट करेल असे सांगून त्यांनी त्यांचा निर्णय राखीव ठेवला आहे.