अहमदनगर - होम क्वारंनटाईन असणाऱ्या रुग्णांना घरीच राहण्याच्या सूचना वारंवार दिल्या जात आहेत. मात्र, शहरातील सर्जेपुरा भागात हातावर होम क्वारंनटाईनचा शिक्का असलेला एक जण दिसून आला. त्याला ताब्यात घेत त्याच्यावर कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. भारतात कोरोनाबाधितांचा आकडा ६०० च्या वर पोहोचला आहे. त्यातच महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे देशात २१ दिवस लॉकडॉऊन घोषित करण्यात आला आहे. सर्वांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, सर्जेपुरा भागात एक होम क्वारंनटाईन असलेला एकजण फिरताना आढळून आला. ही गोष्ट लक्षात येताच शहर विभागाचे उपाधीक्ष संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा मोठा फौजफाटा त्याठिकाणी दाखल झाला. त्यानंतर आरोग्य विभागाला कळविण्यात आले. तातडीने अॅम्बुलन्स आणि आरोग्य कर्मचारी देखील दाखल झाले. त्यानंतर त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरोधात कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.