अहमदनगर- जिल्ह्यातील श्रीक्षेत्र भगवान गड, गहिनीनाथ गड व नारायणगड या धार्मिक तीर्थक्षेत्र आराखडा विकासासाठी निधी संदर्भात यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पोकळ व राजकीय घोषणा करण्यात आल्या. तसेच भाविकांची फसवणूक करून भावना दुखावल्याचा आरोप करत राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांचा अहमदनगर जिल्हा भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन निषेध करण्यात आला.
राज्यात भगवान बाबांचा मोठा भक्त समुदाय
नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र भगवानगड, गहिनीनाथ गड व नारायणगड हे महाराष्ट्रामधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. संत भगवान बाबांनी कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून समाजातील अनिष्ट रूढी व परंपरा बंद करत हुंडाबंदी, पशुहत्या बंद केल्या. ऊस तोडणी कामगारांच्या मुलांसाठी शाळा वस्तीगगृह उभारून शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. वारकरी सांप्रदाय यांमधील फिरता नारळी सप्ताह सुरू करून सुज्ञ व सुसंस्कृत आध्यात्मिक परंपरा निर्माण केली.
यशवंतराव चव्हाण, गोपीनाथ मुंढे यांचे गडासाठी योगदान-
गडाचे नामकरण भगवान गड करण्यासाठी व संत भगवान बाबा यांचे आशीर्वाद घेण्यासाठी संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी संत भगवान बाबांच्या कार्याची दखल घेत भगवान बाबा गडावर येऊन विकासाचा पाया रोवला होता. बहुजन समाजाचे नेते बबनराव ढाकणे, लोकनेते गोपीनाथ मुंडे तसेच विविध राजकीय पक्षातील नेत्यांनी भगवानगड विकासात मोलाचे योगदान दिले आहे. मुंडे यांचा दसरा मेळावा तर राज्यात प्रसिद्ध होता. याच गडावरून आशीर्वाद घेत त्यांनी राज्य पादाक्रांत केले. मला गडावरून दिल्ली दिसते हे मुंडेचे वाक्य त्यावेळी खूप गाजले होते. सर्वच राजकीय पक्षांचे नेते गडावर आवर्जून येत असले तरी गडावर खरी हुकूमत मुंडे यांचीच शेवटपर्यंत राहिली. त्यांच्या काळात गडाला भरीव आर्थिक मदत सरकारकडून मिळालेली आहे.
अनिश्चित निधीबद्दल पवार-धनंजय मुंडेंनी माफी मागावी-
भगवानगड त्याचबरोबर गहिनीनाथ गड व नारायणगड धार्मिक तीर्थक्षेत्र आराखडा विकासासाठी चालू असलेले सन 2021-22 या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनिश्चित निधीची पोकळ घोषणा केल्या. केवळ राजकीय फायद्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिवेशनात भगवान गड, गहिनीनाथ गड, नारायण गड यांना आवश्यकतेनुसार निधीची तरतूद केली जाईल, असे आश्वासन दिले. भगवानगड गहिनीनाथ गड व नारायणगड तीर्थक्षेत्र पर्यटन विकासासाठी निधीची रक्कम याचा खुलासा न केल्याने महाराष्ट्रातील जनतेचा तसेच भक्तांचा स्वाभिमान दुखावला गेला असल्याचा आरोप जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडे यांनी संत भगवान बाबा, संत वामनभाऊ, संत नारायण महाराज यांच्या राज्यातील भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. तरी त्यांनी सर्व भक्तांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी भाजपने केली आहे.
राजकारण तापणार, भाजप मंत्र्यांना जाब विचारणार-
नगर-बीड,औरंगाबाद जिल्ह्याच्या सरहद्दीवर वंजारी समाज मोठ्या संख्येने आहे. या समाजाचे नेतृत्व मुंढे कुटुंबाकडे राहिले असून आता पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. या संघर्षातूनच बीड जिल्ह्यात गोपीनाथ गडाची निर्मिती झाली. त्यामुळे भक्तांच्या दृष्टीने संवेदनशील भक्तीचा विषय असताना सरकारने अर्थसंकल्पात थेटपणे निधीची तरतूद न करता अनिश्चित निधीची घोषणा केल्याने भाजपच्या हाती आयते कोलीत मिळाल्याचे बोलले जाते.
गडाच्या बाबतीत कोणतीही निधीची तरतूद केली नाही ही केवळ धूळफेक आहे. याचा निषेध म्हणून भाजपच्या वतीने जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपचे दिलीप भालसिंग, तुषार पोटे, युवराज पोटे, धनंजय बर्डे, संतोष लगड, गणेश कराड, अर्जुन ढाकणे, डॉक्टर हर्षल वारे उपस्थित होते.
हेही वाचा- कोरोना निर्बंधासाठी प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश; मुख्य सचिवांनी घेतला राज्यातील जिल्ह्यांचा आढावा