संगमनेर (अहमदनगर) - संगमनेर प्रथमवर्ग न्यायालयाने आज (शुक्रवार) इंदोरीकर महाराजांना हजर राहण्याचा आदेश दिला होता. मात्र, जिल्हा न्यायालयाने या आदेशाला स्थगिती दिली आहे. आता इंदोरीकर महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणाची 20 ऑगस्ट रोजी संगमनेर येथील जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे.
प्रसिद्ध किर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी मुला - मुलीच्या जन्माविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्या विरोधात 26 जून रोजी संगमनेर प्रथमवर्ग न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आज इंदोरीकर महाराजांना हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यापुर्वीच 4 ऑगस्ट रोजी इंदोरीकर महाराजांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. त्याला जिल्हा न्यायालयाने स्थगिती आदेश दिल्याने इंदोरीकरांना दिलासा मिळाला आहे. पुढील सुनावणी 20 ऑगस्ट रोजी संगमनेर येथील जिल्हा न्यायालयात होणार असून, सरकारी वकील आणि इंदोरीकर महाराजांचे वकील त्यांची बाजू मांडणार आहेत. येत्या 20 तारखेला इंदोरीकर महाराजांना कोर्टात हजर राहण्याची गरज नसणार असल्याचे इंदोरीकर यांचे काम पाहात असलेले वकील अॅड. के.डी धुमाळ यांनी सांगितले.
दरम्यान, सत्र न्यायायालयाच्या स्थगीती आदेशासंदर्भात प्रतिक्रिया देताना तक्रारदार आणि अंनिसच्या राज्य सचिव रंजना गवांदे यांनी आमचा लढा कोणत्या व्यक्ती विरोधात नसून कायदेशीर लढा आहे. सरकारी पक्षाकडे आम्ही आवश्यक ते पुरावे सादर केले असून सरकारी पक्ष आपली बाजू 20 ऑगस्टला न्यायालयात मांडेल असे त्यांनी सांगितले.