अहमदनगर - 'भगवा सोडून पळालेल्या गद्दारांच्या यादीत आमचे नाव नाही, त्यांनी स्वत:ची औकात बघावी आणि नंतर माझ्या सारख्यावर टीका करावी' असा शिवसेना स्टाईल टोला राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी राणे पिता-पुत्रांवर लगावला आहे. अहमदनगरमधील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
नाणार प्रकल्पावरून भारतीय जनता पार्टीचे नेते नारायण राणे आणि शिवसेना मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपामध्ये राणेंचे पुत्र नितेश राणेंनी उडी घेतली. गुलाबराव पाटलांवर आरोप करत, पाटील शुद्धीवर असतात का? अशी वैयक्तिक टीका देखील नितेश राणेंनी केली होती. नाणार सोबतच नारायण राणेंनी सुशांतसिंह प्रकरणावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. या पार्श्वभुमीवर मंत्री गुलाबराव पाटील अहमदनगरमध्ये आले असता त्यांनी राणे पिता-पुत्रांच्या आरोपाला शिवसेना स्टाईल प्रत्युत्तर दिले आहे.
हेही वाचा - ठाकरे सरकारचा कोकणी माणसांवर कसला राग?
'नारायण राणे ज्यावेळी शिवसेनेत होते त्यावेळी आम्ही त्यांचे पाठीराखे होतो. त्यावेळी त्यांचा मुलगा अंडरपँड-बनियानवर होता. मी राजकारणात ३६ वर्ष घातलेला कार्यकर्ता आहे, त्यामुळे त्यांनी मला शिकवू नये. आम्ही एकाच धुंदीत असतो आणि ते म्हणजे भगव्याच्या, तुम्ही तर भगवाही सोडून पळाले. आम्ही निष्ठावंत आहोत, गद्दाराच्या यादीत आमच नाव नाही. त्यामुळे आदी स्वत:ची औकात कुठे आहे ती बघावी आणि नंतर आमच्यावर टीका करावी. शेवटी नैराश्य आलेल्या माणसाला दुसरे काम नसते'. अशी जळजळीत टीका गुलाबराव पाटील यांनी राणे पिता-पुत्रांवर केली आहे.
मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचा देशात पाचवा क्रमांक आल्याने पोटशूळ -
'महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देशात सर्वेत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून पाचवा क्रमांक आला आहे, हे भाजपाला पाहावत नाही. त्यामुळे त्याच्याकडे काही मुद्दा नसल्याने ते सुशांतसिंह प्रकरणी ठाकरे सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. वास्तविक पाहाता जे मुख्यमंत्री जनतेच्या मनात आहे, त्यांना कितीही बदनाम करण्याचा प्रयत्न झाला तरीही काहीही फरक पडणार नाही'. अशी प्रतिक्रिया शिवसेना मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिली आहे.
हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष: एक शाळा अशीही जिथे मागील ४ वर्षांपासून दिले जातात ऑनलाइन शिक्षणाचे धडे..