अहमदनगर - कर्जत-जामखेड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी आज सकाळी चौंडी या आपल्या जन्मगावी मतदान केंद्रावर सहकुटुंब जाऊन मतदानाचा हक्क बजावला. मतदानाला जाण्यापूर्वी कुटुंबीयांनी त्यांचं औक्षण केलं तसेच वडिलधाऱ्यांनी आशीर्वाद दिले. यावेळी बोलताना शिंदे यांनी आपला विजय नक्की असल्याचा विश्वास व्यक्त केला.
जिल्ह्याबाहेरील आलेल्या धनाढ्य शक्तींचा कोणताही परिणाम मतदारांवर होणार नाही आणि मतदार आपल्यालाच विजयी करतील असे यावेळी ते म्हणाले. राज्यामध्ये युतीच्या रेकॉर्डब्रेक जागा येतील आणि पुन्हा एकदा फडणवीस सरकार सत्तेवर येईल, असे ते म्हणाले. येणाऱ्या मंत्रिमंडळात आपण पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्री असू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.