अहमदनगर - देशाची लोकशाही बळकट होण्यासाठी ग्रामस्तरावर होणारी ग्रामपंचायत निवडणूक ही खुल्या आणि निकोप वातावरणात पार पाडून त्यात मतदान करणे गरजेचे आहे. सशक्त ग्रामपंचायत हा लोकशाहीचा पाया असून त्यावरच विधानसभा आणि लोकसभा उभ्या असणार असल्याने नागरिकांनी पुढे येत मतदान करून लोकशाही मजबूत करावी, असे आवाहन जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले आहे. राळेगणसिद्धी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना अण्णांनी ही भावना व्यक्त केली.
अण्णांनी बजावला मतदानाचा हक्क -
राळेगणसिद्धीमध्ये एक निवडणूक अपवाद वगळता नेहमी बिनविरोध निवडणुका पार पडल्या आहेत. गावात लाभेश औटी आणि जयसिंग मापारी असे दोन गट असले, तरी अण्णांनी पुढाकार घेत या दोन्ही गटांना एकत्र करत निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न केले असून दोन्ही गटांनी अण्णांच्या विनंतीला मान देत निवडणूक विरहीत ग्रामपंचायत कारभार केला आहे. यंदा मात्र गावातील एक तिसरा गट पुढे येत त्यांनी अण्णांना आग्रह करत निवडणूक प्रक्रिया होण्यासाठी विनंती केली आणि त्यानुसार यावेळी औटी-मापारी विरुद्ध दुसरा 'श्याम बाबा' पॅनलमध्ये निवडणूक लागली. त्या अनुषंगाने आज शुक्रवारी मतदान पार पडत असल्याने अण्णांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला. तत्पूर्वी अण्णांनी आपले श्रद्धास्थान असलेल्या यादवबाबा मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
निकोप आणि सदृढ लोकशाहीसाठी मतदान करा -
मतदान केल्यानंतर अण्णांनी माध्यमांशी बोलताना ग्राम संसदेचे महत्त्व सांगताना लोकशाहीत ग्रामपंचायत निवडणूक ही लोकशाहीचा पाया असल्याचे नमूद केले. ग्रामसंसद ही सर्वोच्च असून त्यातूनच देशातील विधानसभा आणि लोकसभा या तयार होतात, त्यामुळे लोकशाहीचा पाया मजबूत करण्यासाठी मतदारांनी आपला हक्क बजावला पाहिजे, असेही अण्णा म्हणाले.
हेही वाचा - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल