अहमदनगर- महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्याची जीवनदायिनी असलेली गोदावरी नदी वाहती झाली आहे. दोन दिवसापासून नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे.
अनेक दिवसापासून गोदावरी नदीचे कोरडेठाक पडलेले पात्र पाण्याने भरभरून वाहत असल्याने नदिकाठची जनता सुखावली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावच्या पुढे हे पाणी पोहचले असून जायकवाडीच्या दिशेने हे पाणी झेपावत आहे.
नदिकाठी असलेल्या पाणी योजना आणि शेतीला या पाण्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे नागरिक आणि शेतकरी आनंदी झाले आहेत. अनेक महिन्यांपासून दुष्काळाचा सामना करत असलेल्या या नदीकाठच्या गावांना यामुळे मोठा आधार मिळाला आहे. पाणी टंचाईचे संकट यामुळे दूर होणार आहे. तसेच पठार भागातही सर्वदूर मोसमी पाऊस पडत असल्याने खरीप पिकांना जीवनदान मिळणार आहे.