अहमदनगर - गणेश स्थापनेच्या तिसऱ्या दिवशी महाराष्ट्रामध्ये गौरी पूजन केले जाते. ३ दिवसांचे गौरी पूजन हा महिलांसाठी खास उत्सव असतो. यात महिला गौरी पुजेच्या उत्सवासाठी १०० विविध प्रकारचे नैवेद्य बनवून गौरीला दाखवतात. सासरी गेलेल्या सासुरवाशीन मुली ३ दिवसाच्या गौरी उत्सवासाठी माहेरी येतात.
गौरी पुजन म्हणजे आदी शक्ती पार्वती मातेचे पुजन. भाद्रपद महिन्यात हे गौरी पूजन महाराष्ट्रात मोठ्या आस्थेने आणि श्रद्धेने केल्या जाते. भाद्रपद महिन्यात गणपती स्थापनेनंतर जेष्ठा व कनिष्ठा या दोन बहिणी आपल्या मुलांसोबत दिड दिवसांसाठी येतात. ज्या घरात जेष्ठा व कनिष्ठाची स्थापना होते त्या घरातील मुलींना माहेरी येण्याचे आमंत्रण दिले जाते आणि त्यांच्या हाताने गौरीचे पूजन करण्यात येते. तर, काही ठिकाणी अविवाहित मुलींच्या हातानेही गौरी पूजन करतात.
पहिल्या दिवशी गौरीचे स्वगत मोठ्या उत्साहाने केले जाते. तर, दुसऱ्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवले जातात. महालक्ष्मीच्या पुजनामध्ये १६ संख्येला खूप महत्व आहे. त्यामुळे १६ प्रकारच्या भाज्या, ज्वारी आणि आंबवलेल्या पदार्थांचे नैवेद्य दाखवले जाते. त्याचप्रमाणे मिष्ठान्नाचे जेवणदेखील नैवेद्यात असते. हे नैवेद्याचे जेवण व पदार्थ घरातील सुवासीनीच्या हाताने बनवले जाते. गौरी स्थापनेची सजावट महिला स्वत:च्या हाताने करतात. तसेच सुवासिनीच्या हाताने जेष्ठा व कनिष्ठा यांचा शुंगार केला जातो. तसेच सगळ्या प्रकारचे दागिने व अलंकाराने सजवल्या जाते त्यांना सजविले जाते.
३ दिवसांचा हा सन महिलांसाठी खूप उत्साहाचा व आनंदाचा असतो. ज्या घरामधे गौरी पूजन केले जाते त्या घरांमध्ये मुलींची पूजा केली जाते. त्यानंतर, गौरी पूजनाच्या तिसऱ्या दिवशी महालक्ष्मीचे कथेचे वाचन व श्रवण करून जेष्ठा व कनिष्ठा गौरी यांचे विसर्जन केले जाते.