अहमदनगर - राहुरीत दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्यासह अन्य पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित कारवाई केली आहे. यामध्ये चार आरोपींसह आठ दुचाकी देखील हस्तगत करण्यात आल्या आहेत. तसेच आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे.
नगर-मनमाड राज्य महामार्गावर मुळा नदीच्या पुलाजवळ काही व्यक्ती संशयितरित्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलीस पथकाने छापा टाकला. दरोडा टाकण्यासाठी आवश्यक हत्यारांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दुचाकी देखील जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांना पहाताच पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पाठलाग करून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
अनलॉक २.० सुरू झाल्यापासून अनेक ठिकाणी समाजजीवन पूर्ववत होत आहे. मात्र सर्व दुकानांना ठराविक वेळेतच व्यवसाय करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे संध्याकाळच्या सुमारास दुकानं बंद होतात. तसेच बँकांच्या वेळा देखील बदलल्या आहेत. त्यामुळे दरोडा टाकण्यास मोकळे रान मिळाल्याचा आरोपींचा समज नगर पोलिसांनी मोडीत काढून त्यांना ताब्यात घेतले आहे.