अहमदनगर - जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना स्थितीबाबत घेतलेल्या आढावा बैठकीनंतर जिल्ह्यातील कोरोनाबाबतची परस्थिती नियंत्रणाबाहेर होत असल्याने चौदा दिवसांचा जनता कर्फ्यु लावण्याचा निर्णय घेतला. जनता कर्फ्युत आरोग्य विषय वगळता इतर सर्व अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून दोन हजारांवर रुग्ण वाढत असताना आता गेल्या चार दिवसात हीच संख्या रोजची तीन हजारांवर गेली आहे. दुसरीकडे रुग्णसंख्या वाढत असताना त्यांना रुग्णसुविधा पुरवणे आरोग्य यंत्रणेला अशक्य होऊ लागले आहे. खाटांपासून ते ऑक्सिजन, रेमडेसीवर इंजेक्शन यांच्या तुटवड्या मुळे नागरिकांत रोष आहे तर कोरोना रुग्णांची मृत्यू संख्या ही रोज चाळीसवर आहे. एकूणच परस्थिती अजून हाताबाहेर गेल्यास प्रशासनाला ती नियंत्रित करणे अशक्य होऊ नये म्हणून पालकमंत्र्यांनी जिल्ह्याचा एकूण आढावा घेत चौदा दिवसांचा जनता कर्फ्यु लागू केला आहे. हा जनता कर्फ्यु कडकपणे पाळला जावा यासाठी पोलीस यंत्रणेला सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांना जनता कर्फ्युबाबत नियमावली काढण्याची सूचना-
आज शनिवारी झालेल्या आढावा बैठकीस पालकमंत्र्यांसह, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे उपस्थिती होते. राज्य सरकारने सध्या कडक निर्बंधाची जाहीर केलेली नियमावली नागरिक पाळत नाहीत. कोणी भाजीपाला कोणी फळे, किराणा, मिठाई, बेकरी वस्तू खरेदीच्या नावाखाली बाहेर पडत आहे, त्यामुळे आता नगर जिल्ह्यासाठी जनतेनेच स्वयंशिस्त म्हणून पुढील चौदा दिवस नियम पाळायचे आहेत. तसे आदेश काढण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिली जाणार आहे, असे मुश्रीफ यांनी माध्यमांना दिलीय. आरोग्य सुविधा वगळता इतर सर्व जीवनावश्यक आस्थापने बंद ठेवल्या जातील.