अहमदनगर - जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरफोड्या आणि जबरीचोऱ्या करणाऱ्या एका टोळीचा म्होरक्या भगवान ईश्वर भोसले आणि चोरीचे सोने विकत घेणारा सोनार रामा अभिमन्यू इंगळे या दोघांना अटक केली आहे. त्यांच्या कडून पंचवीस तोळे सोन्याचे विविध दागिने, दोन मोटारसायकल, मोबाईल, चोरी करतानाची हत्यारे असा मुद्देमाल जप्त केला आहे. अहमदनगर जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई बीड जिल्यातील शिरूर कासार येथे जाऊन केली आहे.
चोरीचे सोने विकत घेणारा सोनारही ताब्यात-
जिल्ह्यात सलगपणे होत असलेल्या घरफोड्या आणि जबरी चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेने एक विशेष पथक स्थापन करून तपास केला असता या घरफोड्या भगवान ईश्वर भोसले (रा-बेळगांव ता-कर्जत) याच्या टोळीकडून होत असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांकडून मिळाली. भगवान भोसले हा भावासह शिरूर कासार(जिल्हा-बीड) इथे चोरीचे सोने विकण्यासाठी येणार असल्याची माहिती भेटल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने कडा-शिरूर कासार रोडवर सापळा लावला. या सापळ्यात भगवान भोसले हा टोळीचा म्होरक्या पोलिसांच्या हाती लागला. मात्र, त्याचा भाऊ पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी पकडलेल्या भगवान भोसले कडून नऊ तोळे सोने जप्त केले तसेच चोरीचे सोने विकत घेणारा शिरूर कासार येथील गणेश ज्वेलर्सचा मालक रामा अभिमन्यू इंगळे याच्या कडून सोळा तोळे सोने, चांदी असे जवळपास चौदा लाख तीस हजारांचा ऐवज जप्त केला. आरोपी कडून दोन मोटारसायकल, मोबाईल फोन, चोरी करताना वापरलेली हत्यारे जप्त केली आहेत.
आरोपीं विरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल -
टोळीत सहा-सात आरोपी असून त्यातील टोळीचा म्होरक्या भगवान ईश्वर भोसले याच्या विरोधात नगर तालुकाज एमआयडीसी, पारनेर, कर्जत, श्रीगोंदा, आष्टी, सांगोला या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. एका तालुक्यात घरफोडी, जबरी चोरी केली की नंतर दुसऱ्या तालुक्यात जाऊन हे आरोपी गुन्हे करत होते, चोरीचे सोने हे बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथील सोनाराला विकत होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, पीएसआय गणेश इंगळे, पोना-सुनील चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, बबन माखरे, आण्णा पवार, संदीप दरंदले, शंकर चौधरी, दीपक शिंदे, जालिंदर माने आदींच्या पथकाने ही कारवाई केली.