अहमदनगर - 'कोपर्डी' हा शब्द उच्चारला तरी अंगावर शहारे येतात. अहमदनगर जिल्ह्याच्या एका खेडेगावात काही नराधमांनी क्रौर्याच्या सीमा ओलांडत चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली होती. ही घटना होऊन काल चार वर्ष पूर्ण झाली. या प्रकरणातल्या तीनही आरोपींना 29 नोव्हेंबर 2017ला अहमदनगरच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवत फाशीची शिक्षा ठोठावली आहे. मात्र, आरोपींनी उच्च न्यायालयात अपील केल्याने या शिक्षेची अंमलबजावणी झालेली नाही.
आजही निर्भयाच्या आठवणीने पाणावतात डोळे -
चार वर्षे झाली आमच्या मुलगी आम्हाला सोडून गेली. मात्र, आजही आमचा दिवस तिच्याच आठवणीने उगवतो आणि मावळतो. घटना होऊन इतकी वर्ष झाली अजूनही आमच्या काळजाच्या तुकड्याला न्याय मिळाला नाही. तिच्या मारेकऱ्यांना फासावर लटकल्यावरच तिच्या आत्म्याला शांती मिळेल, असा आक्रोश निर्भयाचे आई, वडील आणि लहान बहिणी करत आहेत.
13 जुलै 2016 रोजी काळजाचा ठोका चुकेल असे क्रौर्य कोपर्डी येथे घडले होते. त्या दिवसापासून आजपर्यंत न चुकता तिचे आई-वडिल न चुकता तिच्या स्मृती स्थळावर नंदादीप लावतात. दररोज केलेल्या भाजी-भाकरीचा नैवेद्य तिथे नेऊन ठेवतात मगच त्यांच्या गळ्याखाली घास जातो. काल निर्भयाला कुटुंबीयांनी श्रद्धांजली वाहिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन टाळण्यात आले.
निर्भया ही मराठा क्रांती मोर्चाची प्रेरणा-
कोपर्डीच्या घटनेनंतर कोपर्डीच्या निर्भयाला न्याय मिळावा, गुन्हेगारांना तातडीने कठोर शिक्षा व्हावी, खटला जलद गती न्यायालयात चालावा, सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती व्हावी, या मागण्यांसाठी मराठा समाज एकत्र आला. यासाठी शिवप्रहार संघटनेचे संजीव भोर, संभाजी ब्रिगेडचे राजेश परकाळे यांनी सर्वप्रथम पुढाकार घेतला. पुढे या मराठा आंदोलनाला राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळाला आणि मराठा क्रांती मोर्चाची स्थापना झाली. नंतर त्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा समाविष्ट करण्यात येऊन राज्यभर अनेक मराठा क्रांती मूक मोर्चे निघाले.
काय घडले होते 13 जुलैला?
कोपर्डी गावातील एक शाळकरी मुलगी सकाळी सायकल घेऊन गावातच असणाऱ्या आपल्या आजोबांच्या घरी काही सामान आणण्यासाठी गेली होती. तिकडून परतत असताना आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू बाबुलाल शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केली. खूप वेळ मुलगी घरी आली नाही म्हणून कुटुंबीयांनी शोधाशोध केल्यानंतर तिचा मृतदेह आढळला.