अहमदनगर- जिल्ह्यात कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू असताना जिल्हावासियांना 'कभी गम कभी खुशी' अशी परस्थिती सध्या आहे. काल गुरुवारी जिल्ह्यात नवे पाच कोरोनाबाधित निष्पन्न झाले असताना आज दिलासादायक चित्र आहे. कारण आज शुक्रवारी चौदा दिवसानंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह असल्याचा चार रुग्णांचा अहवाल जिल्हा आरोग्य यंत्रणेला प्राप्त झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. १४ दिवसांच्या उपचारानंतर त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने हॉस्पिटलमधून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला.
आजमितीला जिल्ह्यात एकूण ३८ करोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी २४ जण बरे होऊन घरी परतले आहेत. दुर्दैवाने दोघांचा मृत्यू झाला. आता १२ जणांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. आज डिस्चार्ज देण्यात आलेल्यांपैकी दोन जण नगर शहराजवळच्या आलमगीर येथील एक जण शहरातील सर्जेपुरा येथील तर एक जण बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील आहे.
दरम्यान, आज या सर्वांना आज दुपारी बूथ हॉस्पिटलच्या आरोग्य दूतांनी पुष्पगुच्छ देत टाळ्यांच्या गजरात घरी जाण्यास निरोप दिला. मात्र, या सर्वांना घरी गेल्यावर पुढील चौदा दिवस होम क्वारंटाईन राहणे सक्तीचे आहे. आतापर्यंत दाखल झालेल्या ३८ रुग्णांपैकी तब्बल चोवीस रुग्ण हे कोरोनामुक्त झाले असल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणेसाठी ही समाधानाची बाब आहे.