अहमदनगर - श्रीगोंदा तालुक्यातील बाबुर्डी येथील एका शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या चार परप्रांतीय सख्ख्या भावांना जलसमाधी मिळाली आहे. ही घटना मंगळवारी (23 जून) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. नवाजीस अहमद ( वय 9 ), दानेश अहमद ( वय 13 ), अरबाज अहमद ( वय 21 ), फैसल अहमद ( वय 18 ) असे मृत्यू झालेल्या भावंडांची नावे आहेत.
'ईटीव्ही भारत'ला मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील काही कुटूंबे गुऱ्हाळावर कामासाठी आले आहेत. यात सलीम अहमद हे पत्नी व चार मुलांसह आले होते. मंगळवारी दुपारी चारही मुलं आणि त्यांचा मावसभाऊ असे मिळून पाच जण आई, वडिलांचा डोळा चुकवून शेततळ्यात पोहण्यासाठी गेले होते.
पाचही जण शेततळ्यात सोडलेल्या ठिंबकच्या पाइपला पकडून पोहत होते. तेव्हा अचानक पाइप तुटला आणि नवाजीस आणि अरबाज पाण्यात बुडू लागले. तेव्हा त्यांना वाचवण्यासाठी फैजल आणि दानेश गेले. पण तेही बुडाले. तर मावसभाऊ समीर शेख बचावला.
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, या चारही भावडांचे मृतदेह नागरिकांच्या मदतीने शेततळ्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. या घटनेमुळे बाबुर्डी गावावर शोककळा पसरली आहे.
हेही वाचा - शिर्डीत भिशीचे पैसे न भरल्याने एकाला बेदम मारहाण; परस्परांवर गुन्हे दाखल
हेही वाचा - आमची बांधिलकी जनतेशी... कधी 'सिल्व्हर ओक' तर, कधी 'मातोश्री'वर अस्वस्थ येरझारा घालत नाही!