अहमदनगर - नेवासा तालुक्यातील खेडले परमानंद येथील सोनाराच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून लुटणाऱ्या टोळीतील चार आरोपींना अटक करण्यात आली. जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. या लुटमारीसाठी एका सोनारानेच आरोपींना टीप दिली असल्याची धक्कादायक बाब समोर आली.
21 जानेवारीला निखिल आंबिलवादे हे आपले दागिन्यांचे दुकान बंद करून दुकानातील 7 लाख 90 हजार रुपये किंमतीचे सोन्याचांदीचे दागिने बॅगमध्ये ठेवून आपल्या गावी परतत होते. या माहितीवरून चोरट्यांनी लुटीची योजना बनवली. पानेगाव रस्त्यावर आरोपींनी आंबिलवादे यांना रस्त्यात अडवून डोळ्यात मिरचीची पूड टाकून त्यांच्याकडील दागिन्यांची बॅग पळवून नेली. कोल्हार येथील सोनार विजय रामकृष्ण देडगावकर यांनी आरोपींना टीप दिली होती आणि चोरीचे दागिनेही त्यांनीच खरेदी केले.
हेही वाचा - मुंबई कस्टम विभागाकडून दीड कोटींचे ड्रोन कॅमेरे जप्त
या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा समांतर तपास पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने केला. सोने लुटणाऱ्या टोळीतील निखिल रणवरे, सोहेल जुबेर शेख, आवेज जुबेर शेख, मतीन गुलाब पठाण यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना टीप देणारा सोनार आणि इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.