अहमदनगर - यशस्वी उद्योजकतेला समाज कार्याची जोड देऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम बारामती अॅग्रो लिमिटेड सातत्याने करत आली आहे. हाच दृष्टिकोन कायम ठेवत कोरोनाच्या परिस्थितीत बारामती अॅग्रो कंपनी आणि आमदार रोहित पवार यांनी अहमदनगर जिल्हा आरोग्य व्यवस्थेसाठी 40 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे सुपूर्त केले आहेत.
जिल्हा रुग्णालयावरील ताण हलका करण्याचा प्रयत्न -
नावीन्यपूर्ण व प्रभावी उपाय योजनांद्वारे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी आमदार रोहित पवार सध्या कार्यरत असल्याचे दिसते आहेत. हे प्रयत्न केवळ आपल्या कर्जत-जामखेड मतदार संघा पुरतेच मर्यादित न ठेवता जिल्हा स्तरावरही ते प्रयत्न करताना दिसत आहेत. कर्जत-जामखेड सह जिल्ह्यातील विविध तालुक्यातील रुग्ण उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल होत आहेत. परिणामी जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सुविधांवर ताण पडत आहे. सद्यपरिस्थितीत कोरोना रुग्णांची वाढती संख्या व निर्माण होणारा ऑक्सिजनचा तुटवडा लक्षात घेऊन आमदार रोहित पवार व बारामती ॲग्रोने सामाजिक बांधिलकीतून 40 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर जिल्हा रुग्णालयाला दिले आहेत.
तीनशे खाटांचे कोविड केअर सेंटर लवकरच कार्यान्वित -
कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून नगर येथील पोलीस परेड ग्राऊंडवर उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरसाठी देखील काही उपकरणे दिली आहेत. पोलीस परेड ग्राउंडवर तीनशे खाटांचे कोविड केअर सेंटर लवकरच सुरू होणार आहे. यासाठी महानगरपालिका, शासनाचा आरोग्य विभाग मदत करणार आहे.
इलेक्ट्रिक प्रणालीवर हवा व पाण्यापासून ऑक्सिजनची निर्मिती -
कोरोनाबाधित रुग्णांसाठी सुरुवातीच्या काळात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर हे उपक्रम हे उपकरण प्रभावी ठरते. या साधनात इलेक्ट्रिक प्रणालीवर हवा आणि पाण्याद्वारे ऑक्सिजनची निर्मिती केली जाते. एकाच वेळी पाच लिटर ऑक्सिजन सांभाळण्याची क्षमता असल्याने याचा कोरोना रुग्णांना चांगला लाभ होतो. पाच लिटर आणि सात लिटर अशा दोन प्रकारचे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आलेली आहेत. यावेळी आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त शंकर डांगे, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे यांच्यासह इतर अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.
प्रत्येक संकटात बारामती अॅग्रो मदतीसाठी तत्पर -
राज्यासह देशावर ज्या वेळेस आपत्ती आली, त्यावेळेस एक सामाजिक दायित्व आणि जबाबदारी म्हणून आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो लिमिटेड कंपनीने मदत केली आहे. महाराष्ट्रातील नाशिक, कन्नड, नारायणपूर येथील शासकीय रुग्णालयांसह पुण्यातील ससून रुग्णालयाला वेळोवेळी सिरींज पंप, बेबी वॉर्मर, रुग्णवाहिका, सक्शन मशीन, व्हील चेअर, वॉटर कुलर यासारखी वैद्यकीय मदत कंपनीने केली आहे. मागील वर्षी दुष्काळात मराठवाड्यासह इतर दुष्काळी भागातील तालुक्यांमध्ये टँकरद्वारे स्वच्छ पाणीपुरवठा कंपनीने केला होता. तसेच चारा छावण्याही उभारल्या होत्या. सांगली व कोल्हापूर महापुराच्या वेळेस शालेय विद्यार्थ्यांसाठी शाळेची दप्तरे व पूरग्रस्तांसाठी अन्नधान्यासह वैद्यकीय मदत दिली होती.