अहमदनगर- भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी यांचे बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास दिल्लीत निधन झाले. मंगळवारी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता, त्यांना श्वास घेण्यास जास्त त्रास होत असल्याने मंगळवारी दुपारपासूनच त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यानच आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यूसमयी ते सत्तर वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. 2019 च्या निवडणुकीत गांधी यांना पक्षाने तिकीट नाकारले होते.
अहमदनगर दक्षिणचे तीन वेळेला संसदेत केले प्रतिनिधित्व-
दिलीप गांधी हे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे तीन वेळेस भारतीय जनता पार्टीकडून खासदार होते. तर 2003 ते 2004 दरम्यान केंद्रातील भाजप सरकारमध्ये जहाज बांधणी राज्यमंत्री म्हणून त्यांनी कार्यभार पाहिला. 1999 लाते प्रथम खासदार झाले. पुढे 2009 आणि 2014 साली ते पुन्हा खासदार म्हणून निवडून आले होते. 2019 ला त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारून सुजय विखे यांना उमेदवारी दिली, मात्र दिलीप गांधी यांनी कोणतीही नाराजी व्यक्त न करता पक्षाचे काम अविरत केले.
दिलीप गांधी हे संघाच्या मुशीत वाढले होते. भारतीय जनता पक्षाच्या विविध शाखात त्यांनी काम केले. नगर पालिकेचे नगरसेवक, उपनगराध्यक्ष पद, नगर अर्बन बँकेचे अध्यक्षपद आदी पदे त्यांनी भूषवली होती. पुढे दिल्लीत खासदार असताना मतदारसंघाचे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले.