शिर्डी - 'व्हॅलेंटाइन डे' आला की तरुणाईच्या प्रेमाला जसा बहर येतो तसा फुल उत्पादकांचा चेहराही खुलतो. मात्र, यंदाच्या वर्षी मार्केटमध्ये गुलाब फुलांना अपेक्षित दर मिळत नसल्याने लॉकडाऊनच्या फटक्यानंतर आताही शेतकऱ्यांना आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागत आहे.
शिर्डी साईबाबांच्या मंदिरात मोठ्या प्रमाणात हार फुले वाहिली जातात. मात्र, यंदाच्या वर्षी कोरोनामुळे तब्बल 9 महिने साईबाबांचे मंदिर बंद होते. यामुळे फुल उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. मात्र, आता मंदिर खुले होऊनही भाविकांना मंदिरात हार फुल घेऊन जाता येत नसल्याने फुल उत्पादक शेतकऱ्यांना अजुनही आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागत आहे. त्यात येणाऱ्या 7 ते 14 फेब्रुवारीपर्यंत 'व्हॅलेंटाईन डे'मुळे फुलांची मार्केट तेजीत असते. मात्र, यावर्षी चित्र उलट आहे. सध्या लांब कांड्याच्या फुलांना केवळ साठ रुपये गड्डीचा भाव मिळतो. त्यामुळे व्हॅलेंटाईनला तरी नफा होईल ही आस लावुन बसलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली आहे.
हेही वाचा - बीड: स्पोकन इंग्लिशच्या क्लासकरता गेलेल्या तरुणीची पुण्यात आत्महत्या
शिर्डी परिसरात मोठ्या प्रमाणात फुलांची शेती -
परिसरात मोठ्या प्रमाणात फुलांची शेती केली जाते. मात्र, आधी लॉकडाऊनमुळे मंदिरे बंद आणि मार्केटही बंद होती. यानंतर आठ महिने मोठ्या कष्टाने फुलवलेली फुले कुठे विकायची? हा प्रश्न होता. त्यात आता साई मंदिर उघडुनही मंदिरात तीन महिन्या नंतरही फुले वाहु दिली जात नसल्याने फुलांचा बाजार पार घसरला आहे. आता केवळ 20 रुपये शेकडा इतका फुलांचा भाव झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे.
शिर्डी जवळील सावळीविहीर येथील जमधडे कुटुब फुलांची शेती करतात. त्यांचे वार्षिक उत्पन्न पुर्णता फुलशेतीवर अवलंबुन आहे. मात्र, यंदा या कुटुंबाला मोठी आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. व्हॅलेंटाइनच्या काळात गुलाबांना मोठी मागणी असते. जमधडे कुटुबीयांना दिड एकरात मागील वर्षी व्हलेंटाईनला 2 लाखाचे उत्पन्न मिळाले होते. मात्र, यावर्षी केवळ 75 हजार रुपये उत्पन्न होईल, असे दिसत आहे. यावर्षी कोरोनोमुळे उत्पनात मोठी घट झाली असल्याचे फुल उत्पादक शेतकरी गणेश जमधड़े म्हणाले.