अहमदनगर Gautami Patil : 'सबसे कातील गौतमी पाटील' नेहमीच चर्चेत असते. गणोशोत्सवानिमित्तानं अनेक ठिकाणी गौतमीचे कार्यक्रम पार पडले. गौतमीच्या कार्यक्रमासाठी प्रचंड गर्दीही असते. मात्र, अहमदनगरात गौतमी पाटीलचा कार्यक्रम घेणं आयोजकांना चांगलंच महागात पडलं आहे. कारण कार्यक्रम आयोजित करणाऱ्या मंडळासह गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. अहमदनगरमधील तोफखाना पोलीस ठाण्यात गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करण्यात आला. रस्त्यावर मंडप टाकून रहदारीस अडथळा होईल, अशा प्रकारे गौतमी पाटीलचा कार्यक्रम घेतल्याबद्दल गणपती मंडळाच्या अध्यक्षांसह गौतमी पाटील आणि तिच्या मॅनेजर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (FIR on Gautami Patil in Ahmednagar )
काय आहे नेमकं प्रकरण : अहमदनगर शहरातील पाईपलाईन रोडवर २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी मृत्युंजय प्रतिष्ठान गुलमोहर रोड आणि एकदंत मित्र मंडळ यांच्या वतीनं गौतमी पाटीलचा नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. मात्र या कार्यक्रमाला पोलीस प्रशासनानं परवानगी नाकारली होती. मात्र तरीही हा कार्यक्रम झाल्यामुळं पोलिसांनी गौतमी पाटील, तिचा स्वीय सहाय्यक अशोक खरात आणि कार्यक्रमाचे आयोजक असलेले मृत्युंजय प्रतिष्ठान आणि एकदंत मित्र मंडळाचे अध्यक्ष राहुल सांगळे, आनंद कैलास नाकाडे, हर्षल किशोर भागवत यांच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
कोणत्या कारणामुळं झाला गुन्हा दाखल : गौतमी पाटील आणि तिचा मॅनेजर तसंच गणपती मंडळाच्या अध्यक्षांवर रस्त्यात अडथळा निर्माण होईल, असा कार्यक्रम घेणं तसेच सर्वोच्च न्यायालयानं ध्वनी क्षेपकाबाबत घालून दिलेल्या अटी व शर्तीचं उल्लंघन, डीजेवर कर्णकर्कश आवाजामध्ये गाणी लावून ध्वनी प्रदूषण करणं, वारंवार आवाज कमी करण्याच्या सूचना देऊनही सूचनांकडं दुर्लक्ष करणं इत्यादी कारणांसाठी भादंवी कलम १८८, २८३, ३४१, ३४ सह पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम २, १५ व ध्वनी प्रदूषण अधिनियम २००० चे कलम ३, ४, ५, ६, मुं.पो.का.क ३७ (१) (३) / १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :