शिर्डी - अहमदनगर जिल्ह्यातील चार नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम तीन महिन्यांपूर्वी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला होता. यात शिर्डी नगरपंचायतचा समावेश होता. मात्र, उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार शिर्डीत नगरपरिषद (Shirdi Nagar Parishad) करण्यात यावी यासाठी सर्व पक्षांनी निवडणुकीवर बहिष्कार घातला. अखेर आज शिर्डीत नगरपंचायतची नगरपरिषद करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला.
- निवडणुकीवर टाकला होता बहिष्कार -
नगरपंचायतची नगरपरिषद व्हावी यासाठी किरकोळ अपवाद वगळता सर्वपक्षीयांनी नगरपंचायत निवडणूकीवर बहिष्कार टाकला होता़. ज्या सहा जणांनी बहिष्कार झुगारून अर्ज दाखल केले ते बिनविरोध नगरसेवकही झाले़. मात्र, शिर्डीकरांनी प्रयत्न सोडले नाही़त. नगरपरिषदेसाठी सातत्याने प्रयत्न करणारे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज सकाळी याबाबत माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर व मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांना नगरपरिषद होण्याच्या प्रस्तावावर कालच स्वाक्षरी झाल्याची आनंदवार्ता सांगितली़. यानंतर दुपारी शिर्डीत मोठा जल्लोष साजरा करण्यात आला़. नगरपरिषद होण्यासाठी प्रयत्न करणारे आमदार आशुतोष काळे यांचा नगरपरिषदेसमोर ग्रामस्थांनी सत्कार केला़.
- सर्वपक्षीय नेते आणि शिर्डीकरांचे प्रयत्न -
चार वर्षापूर्वी माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी लोकसंख्येच्या निकषावर नगरपरिषद होण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती़. त्यावेळी न्यायालयाने आदेश देवूनही शासनाने कोणतीही कार्यवाही केली नव्हती़. यामुळे गोंदकर यांनी अवमान याचिका दाखल केली होती़. त्यामुळे शासनस्तरावर जलद हालचाली झाल्या़. अखेरच्या टप्प्यात याच कारणासाठी रविंद्र गोंदकर यांनीही याचिका दाखल केली़ होती. शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करून नगरपरिषद होण्यासाठी ग्रामस्थांसह सर्वपक्षीय नेत्यांचे योगदान असल्याची प्रतिक्रिया याचिकाकर्ते शिवाजी गोंदकर यांनी व्यक्त केली़.
नगरपरिषद होण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार राधाकृष्ण विखे, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार आशुतोष काळे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे या सर्वांचे सहकार्य लाभल्याचे प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे रमेशराव गोंदकर यांनी दिली़. याप्रसंगी कैलास कोते, ज्ञानेश्वर गोंदकर, शिवाजी गोंदकर,कमलाकर कोते, प्रमोद गोंदकर, दत्तात्रय कोते, नितीन कोते, राजेंद्र गोंदकर, दादासाहेब गोंदकर, रमेश गोंदकर, अमीत शेळके, सुधाकर शिंदे, निलेश कोते, सचिन शिंदे, सुजीत गोंदकर, बाबासाहेब कोते, महेंद्र शेळके, सुनील गोंदकर, अशोक कोते, हरीश्चंद्र कोते, अरविंद कोते आदींची उपस्थिती होती.
- आता 'त्यांनी' जिंकून दाखवावे -
नगरपरिषद होण्यासाठी गावाने निवडणुकीवर टाकलेला बहिष्कार झुगारून काहींनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. तसेच ते बिनविरोध निवडूणही आले होते. अशांनी आता निवडणूक लढवून विजयी होवून दाखवावे, असे आव्हान माजी नगराध्यक्ष कैलास कोते यांनी यावेळी दिले़.