अहमदनगर - लोकसभा निवडणूक जवळ येत असून, आघाडी आणि युतीमध्ये जागा वाटपाबाबत संघर्ष सुरू आहेत. अहमदनगर दक्षिणच्या जागेसाठी आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. ही जागा सध्या राष्ट्रवादीकडे आहे. नगर दक्षिणची जागा काँग्रेसला मिळावी, यासाठी जिल्ह्यात घमासान सुरु आहे.
एकीकडे नगर दक्षिणच्या जागेवर काँग्रेसचे श्रीगोद्याचे नेते राजेंद्र नागवडे यांच्या पत्नी अनुराधा नागवडे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. एक दोन दिवसात त्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी चर्चा सुरु आहे. अनुराधा नागवडे या सध्या अहमदनगर जिल्हा परीषदेच्या बालकल्याण समीतीच्या सभापती आहेत.
राष्ट्रवादीच्या हालचालीमुळे विखे गटात आता खळबळ निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी जर एकत नसेल तर सुजय विखेंनी भाजपमध्ये जावे, असा अजब सल्ला विखे समर्थक, कार्यकर्ते देत असल्याचा सूर आहे. याविषयी आज (शनिवार) प्रवरा नगर येथेही बैठक झाल्याची सुत्रांची माहीती आहे. मार्चच्या पहील्या आठवड्यात विखे कुटुबियांची भूमिका जाहीर करु, असे सुजय विखेंनी नगर दक्षिणमध्ये सांगितले होते. त्यामुळे आता विखे म्हणजे आधी सुजय विखे भाजपत जातात का? ही चर्चा जोरात सुरु झाली आहे. त्यानंतर राधाकृष्ण विखे काय भुमिका घेणार? हे ही महत्वाचे असणार आहे.