शिर्डी (अहमदनगर) - केंद्र शासनाने कांद्यावर निर्यात बंदी घालून कांदा उत्पादक शेतकर्यांवर अन्याय केला आहे. खासदार हे लोकसभेतील शेतकर्यांचे प्रतिनिधी आहेत. कांद्यावरील निर्यात बंदी उठविण्यासाठी खासदारांनी लोकसभेत आवाज उठवायला हवा. खासदारांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नगर दक्षिणचे भाजप खासदार सुजय विखे-पाटील यांच्या लोणी गावात 'राख-रांगोळी आंदोलन' केले.
निर्यातबंदीविरोधात शेतकरी संघटनेच्या (शरद जोशी प्रणित) वतीने राज्यव्यापी आंदोलन केले जात आहे. यात सत्ताधारी पक्षाच्या खासदारांच्या घरासमोर जावून आंदोलन केले जाते. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार सुजय विखे हे उत्तरेतील लोणी येथे राहत असल्याने त्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यासाठी कार्यकर्ते जमले. मात्र, पोलिसांनी विखे यांच्या घरापर्यंत संघटनेच्या कार्यकर्त्यांना जावू दिले नाही. त्यामुळे लोणीतील बस स्थानकाजवळील चौकात आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा - एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरून खलबते; पक्ष प्रवेशाबाबत गुप्तता
कांद्याची निर्यात चालू करा, असे लिहिलेली कांद्याची रांगोळी काढली आणि निर्यातबंदी आदेश जाळून राख करण्यात येवून हे अनोखे 'राख-रांगोळी आंदोलन' करण्यात आले. यावेळी शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष अनिल घनवट, विक्रम शेळके, अनिल भुजबळ आधी कार्यकर्ते या आंदोलनाला उपस्थित होते.
हेही वाचा - ...अजूनही मी मुक्ताईनगरातच आहे, अद्याप निर्णय नाही- खडसे