अहमदनगर - कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या बाजरी, मका, सोयाबीन आदी बियाण्यांची योग्य उगवण न झाल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्यांनी बियाणे कंपन्याविरोधात कृषी विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. त्यावर कार्यवाही करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
कोपरगाव तालुक्यात शेतकऱ्यांनी खरेदी केलेले महाबीज, ग्रीनगोल्ड आदी कंपन्यांचे बाजरी, मका, सोयाबीनचे बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याच्या अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या बाजरी, मका, सोयाबीन आदी बियाणांची उगवणच झाली नसल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. त्यामुळे कृषी विभागाने संबंधित कंपन्यांकडून तातडीने नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
आम्ही ग्रीन गोल्ड कंपनीचे बियाणे घेऊन पेरले होते. या कंपनीच्या बियाण्याची उगवण क्षमता चांगली असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, बियाणे दहा टक्के पण उगवले नाही. कंपनीने अथवा शासनाने आमची नुकसान भरपाई द्यावी किंवा पिकाचे दहा क्विंटल उत्पन्न निघणार होते, त्याची भरपाई द्यावी, अशी मागणी महेश भिंगारे या शेतकऱ्याने केली आहे.
शेतकऱ्यांना नवीन बियाणे खरेदी करून वेळेत पेरणी करता येईल, याची खबरदारी आता कृषी विभागाने घेण्याची गरज आहे. बियाणे वेळेत उपलब्ध झाले नाही तर, पेरणीचा हंगाम निघून जाऊन शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते, असे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले.
काही रासायनिक खतांची विक्री करणारे दुकानदार शेतकऱ्यांना युरिया खताची विक्री करीत नसून युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण करत आहेत. मात्र, अन्य रासायनिक खते शेतकऱ्यांना गरज नसताना देखील त्यांच्या माथी मारत असल्याच्या तक्रारी येत असून या तक्रारींची शहानिशा करावी आणि अशा खत विक्रेत्यांवर कारवाही करण्याच्या सूचना आमदार आशुतोष काळे यांनी कृषी विभागाला दिल्या आहेत.