अहमदनगर : कुकडी पाटबंधारे प्रकल्पातील 132 क्रमांकाचा कालवा अधिकाऱ्यांनीच फोडून पाणी दुसरीकडे वळविल्यााचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा मंत्रालयासमोर आत्मदहन करू असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे. तर या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल असे कार्यकारी अभियंत्यांनी सांगितले आहे.
शेतकऱ्यांनी केला अधिकाऱ्यांवर आरोप
श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी 132 नंबरच्या कालव्याचे पुढे जाणारे पाणी जेसीबीच्या माध्यमातून भराव टाकून दुसरीकडे वळविल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या पाण्यातून तलाव भरण्याचे काम सुरू असल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. कालव्यातील पाणी वळविल्याने पुढे असणाऱ्या सहा गावांना मिळणारे पाणी बंद झाले आहे. त्यामुळे बहरात आलेल्या फळबागा सुकून जात आहेत. तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधितांवर त्वरित कारवाई न केल्यास मंत्रालयासमोर आत्मदहन करू असा इशारा देण्यात आला आहे.
कार्यकारी अभियंत्यांनी केल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या
कालवा फोडून अवैधरित्या दिशा बदलल्याबाबत कुकडी पाटबंधारे विभाग दोनचे कार्यकारी अभियंता प्रशांत काळे यांना माहिती विचारली असता, त्यांनी झालेल्या प्रकाराची चौकशी सुरू असल्याचे सांगितले. प्रथमदर्शनी प्राप्त माहितीनुसार कालवा क्रमांक 132 ची देखरेख करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याचे ते म्हणाले. तसेच यासंदर्भात अधिक चौकशी करत असून दोषींवर कारवाई केली जाईल असेही काळे म्हणाले.
प्रहारच्या राजेंद्र काकडेंनी दिला आत्मदहनाचा इशारा
श्रीगोंदा तालुक्यात कुकडीचे शेती सिंचन आवर्तन चालू आहे. शेतकऱ्यांच्या पिकाकडे दुर्लक्ष करून कुकडीच्या अधिकारी-कर्मचारी यांनी संगनमत करुन 132 वरील जोड-कालवा श्रीगोंदा शिवारात फोडून एका तलावात पाणी सोडल्याचा आरोप शेतकरी नेते राजेंद्र काकडे यांनी केला आहे. या भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात प्रशासनाने कारवाई केली नाही तर अधिवेशनादरम्यान मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
पाणी तोडल्याने ही गावे पाण्यावाचून वंचित
लोणी व्यंकनाथ, घारगाव, पारगाव, श्रीगोंदा, बाबुर्डी, शिरसगाव, म्हातारपिंप्री शिवारातील शेतकरी कुकडीच्या पाण्याची अतुरतेने वाट पाहत आहेत. शेतकऱ्यांना थेट पाणी न देता तलावात पाणी सोडले जात आहे. कुकडीचे पाणी हे फक्त शेती सिंचनासाठी आहे. कोणत्याही तलावात पाणी सोडू नये असे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरले आहे. मात्र अधिकाऱ्यांनी या निर्णयाला केराची टोपली दाखविल्याचा आरोप आता होत आहे.
हेही वाचा - तपास यंत्रणांकडून मानसिक छळ होतोय; मनसुख हिरेन यांनी मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्र्यांकडे केली होती तक्रार