अहमदनगर - इयत्ता तिसरीत शिकणारा विद्यार्थी मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने शाळेत 'अरे बळीराजा करू नको आत्महत्या'ही कविता सादर करतो. काही वेळातच समाज माध्यमावर ती कविता व्हायरल होते आणि त्यानंतर दोन तासांनी त्याचे शेतकरी वडील आत्महत्या करतात. ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे अहमदनगर जिल्ह्यातील भारजवाडी या गावात.
![suicide](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/6242738_malhari.jpg)
मल्हारी बटुळे या शेतकऱ्याने नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून गुरुवारी आत्महत्या केली. आत्महत्येच्या दोन तास आधी त्यांचा तिसरीत शिकणारा मुलगा प्रशांत याने शाळेत कविता सादर केली होती. पाथर्डी तालुक्यातील भारजवाडीमध्ये राहणाऱ्या बटुळे यांनी ट्रॅक्टर आणि शेतीसाठी बँकेकडून कर्ज घेतले होते. मात्र, काही महिन्यांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे पीक उद्ध्वस्त झाले. हे कर्ज फेडण्याच्या विवंचनेतून त्यांनी आपले जीवन संपवले. या घटनेने त्यांचा मुलगा प्रशांत पुरता हादरून गेला आहे. बाबा या जगात आता नाहीत, या वास्तवाने तो हवालदील झाला आहे.