अहमदनगर - भारत सरकारच्या फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्यावतीने एक आदेश जारी करण्यात आला आहे. येत्या एक ऑक्टोबरपासून मिठाई दुकानदारांना मिठाईच्या बॉक्सवर त्याचबरोबर दुकानांमध्ये ठेवलेल्या मिठाईच्या ट्रे वर मिठाईची 'एक्सपायरी डेट' दर्शनी भागात ग्राहकांना दिसेल अशी लावावी लागणार आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधित मिठाई दुकानदारांवर कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. त्याअनुषंगाने आता मिठाई दुकानदारही कामाला लागले असून, येत्या एक ऑक्टोबरपासून मिठाईचे बॉक्स त्याचबरोबर मिठाई ठेवलेल्या ट्रे वर एक्सपायरी डेट कशा पद्धतीने ठेवता येईल, याबाबत आदेशानुसार माहिती घेतली जात आहे.
अहमदनगरमधील विविध मिठाई दुकानदारांना याबाबत विचारले असता, त्यांच्याकडून केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आल्याचे सांगतानाच हे नियम मिठाई दुकानदार पाळणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, त्याचबरोबर रोजच्या रोज नव्याने तयार होणारी मिठाई ट्रेमध्ये ठेवत असताना त्या मिठाईची एक्सपायरी डेट दर्शनी भागात लावावी लागणार असल्याने एक प्रकारे काम वाढणार असल्याचे अनेक दुकानदारांनी नाराजीच्या स्वरुपात सांगितले.
तसेच यामधून काही दुकानदार मिठाई जुनी झाली तरी त्याच मिठाईच्या ट्रे वर नव्याने तारीख टाकू शकतात, अशी शंका व्यक्त केली आहे. मात्र, तरीही ग्राहकांच्या दृष्टीने हा निर्णय चांगला असून, ग्राहकांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. नजीकच्या काळामध्ये नवरात्र, दसरा आणि त्यानंतर दिवाळी असे अनेक सण-उत्सव असल्यामुळे या काळामध्ये मिठाईला मोठी मागणी असते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये शुद्ध आणि उच्चप्रतीची मिठाई ग्राहकांना या निर्णयामुळे मिळेल आणि उत्सव चांगल्या प्रकारे साजरा करता येईल, अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिली आहे.