अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार भगवतीपुर येथील पवन खर्डे यांनी बी.इ. मॅकेनिकलचे शिक्षण घेतले आहे. मात्र मोठ्या पगाराची नोकरी न करता ते कोल्हार गावात एक वर्कशॉप चालवतात. खर्डे आपल्या वडिलोपार्जित शेतातच सध्या रमलेले आहेत. मेड इन इंडियामाध्यमातून प्रेरणा घेत खर्डेंनी टाकाऊ वस्तूंपासून आजपर्यंत किमान सात ते आठ विविध शेती विषयक औजारे बनविली आहेत. खर्डे असे अफलातून प्रयोग करीत असल्याने महाविद्यालयातील, कॉलेजमध्ये या क्षेत्रात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी पवन खर्डे यांचे संशोधन पाहण्यासाठी नेहमी भेट देत असतात.
यामुळे बनवली सायकल : पवन खर्डे या युवकाचे कोल्हार गावात एक छोटे वर्कशॉप आहे. वर्कशॉपपासून खर्डे यांचे घर 5 ते 6 किलोमीटर दूर आहे. घरी येण्या-जाण्यासाठी दुचाकी आहे. मात्र, सध्या पेट्रोलचे दर गगनाला भिडले असल्याने वर्षाकाठी पेट्रोलला साधारणतः 40 ते 50 हजार रुपय खर्च येत होता. आपल्याकडे असलेली कला, घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग करत खर्डे यांनी वर्कशॉपमध्ये पडलेल्या भंगार मधील टाकाऊ वस्तूंपासून एक इलेक्ट्रिक सायकल बनविली आहे.
पेट्रोल खर्च वाचला : इलेक्ट्रिक सायकल बनवण्यासाठी खर्डे यांनी 6 हजार रुपयांची बॅटरी खरेदी केली. तसेच 2 हजार रुपयांची मोटर घेतली. तसेच आपल्या वर्कशॉपमधील भंगार टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ सायकल त्यांनी बनविली आहे. ही सायकल बनवण्यासाठी एकूण 8 हजार रूपय खर्च आला आहे. त्याचबरोबर या सायकलची बॅटरी चार्ज केल्यानंतर किमान 50 किलोमीटर ही सायकल चालते. यामुळे दुचाकीच्या पेट्रोलासाठी वर्षाकाठी येणारा 40 ते 50 हजार रुपये खर्च बचत होणार असल्याचे पवन खर्डे यांनी सांगितले आहे.
शासन स्तरावर दखल गरजेची : गवत कापणी यंत्र, प्रोफाईल कटिंग मशीन अर्थात कुठल्याही झाडाची कशी कलाकृती बनवायचे याचे मशीन पवन राजेंद्र खर्डे यांनी बनविले आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार येताच 'मेड इन इंडियाचा नारा दिला होता. याची प्रत्यक्ष कृती देखील देशाने अनुभवली. येथून प्रेरणा घेत पवन खर्डे या युवकाने टाकाऊ वस्तूंपासून अनेक शेतीविषयक उपकरणे बनविली आहेत. याची दखल शासन स्तरासह विविध कंपन्यांनी घेणे नक्कीच स्वागतार्ह ठरेल.