अहमदनगर - लॉकडाऊनमुळे दारू विक्रीला पूर्णपणे बंदी आहे. मात्र, काही ठिकाणी व्याकुळ झालेल्या मद्य शौकिनाची चोरी-छुप्या पद्धतीने देखभाल करत असल्याच्या घटना समोर येत आहेत. अहमदगरमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने साडे आठ लाख रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे.
निरीक्षक संजय सराफ यांच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नगर-पुणे महामार्गावर सुपा येथे ही कारवाई केली. हा मद्यसाठा पारनेर येथून नगरच्या दिशेने आणला जात होता, अशी माहिती अहमदनगर राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक पराग नवलकर यांनी दिली आहे. या प्रकरणी आरोपी दीपक अनंत पवार याला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत निरीक्षक संजय सराफ यांच्या पथकातील महिपाल धोका, बनकर, विजय सुर्यवंशी, वर्षा घोडे यांनी सहभाग घेतला.
गेल्या चौदा दिवसांपासून लॉकडाऊन असल्याने आणि यापुढेही तो सुरूच राहण्याची शक्यता असल्याने तळीराम आता दारूसाठी चांगलेच आसुसलेले आहेत. याचा गैरफायदा काही मद्यविक्रेते घेत असून मूळ किमतीच्या दुप्पट-तिप्पट अधिक दराने चोरी-छुपी दारू विकत आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागांने या परस्थितीत कारवाई करण्याचा धडाका सुरू केला आहे.