अहमदनगर - राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या शिक्षण क्षेत्रातील विचारांनी जगात परिवर्तन झाले. त्यामुळे हे शाश्वत विचार घेऊन भारतामध्येही मोठे परिवर्तन होणे सहज शक्य आहे. यासाठी वंचितांच्या शिक्षणासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग केला आणि सध्याच्या बंदीशाळेचे रुपांतर संधीशाळेत केले तर, देशात आमूलाग्र बदल घडेल, असा विश्वास ज्येष्ठ संशोधक आणि शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञ विवेक सावंत यांनी व्यक्त केले.
संगमनेर येथील जयहिंद लोकचळवळीच्यावतीने आयोजित ग्लोबल कॉन्फरन्समधील शिक्षण प्रणाली या परिसंवादात ते बोलत होते. यावेळी डीआरडीओचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अजय पोद्दार, कृतीशील शिक्षक भाऊसाहेब चासकर, अग्नेक्शा स्पायनिस्वा (पोलंड), सबरिना चौधरी (बांगलादेश), अरिफ रेहमान (पाकिस्तान), संदीप वाकचौरे, रिशिका राका, पदवीधर मतदारसंघाचे आ. डॉ. सुधीर तांबे, आदी उपस्थित होते.
या परिसंवादात विवेक सावंत म्हणाले, शिक्षण हे समाज परिवर्तनाचे मुख्य साधन आहे. मात्र, आजही ग्रामीण भागातील अनेक गरीब मुले शिक्षणापासून वंचित आहेत. या सर्वांना बंदीशाळेतून संधीशाळेत आणणे अत्यंत गरजेचे आहे. रोजगाराभिमुख शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना आवड असलेल्या क्षेत्रांमध्ये करिअरच्या संधी निर्माण करून देण्यासाठी शासनाने, विविध स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे. याचबरोबर नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना करून दिल्यास हे विद्यार्थी नक्कीच यशस्वी होतील, असा विश्वासही त्यांनी सावंत यांनी यावेळी व्यक्त केला.
डीआरडीओचे वरिष्ठ संशोधक डॉ. अजय पोद्दार म्हणाले, महात्मा गांधींच्या विचारांची प्रभावी अंमलबजावणी भारतामध्ये अत्यंत तातडीने होणे गरजेचे आहे. आज आर्थिक विषमता संपवून शिक्षणाच्या माध्यमातून सर्व लोक एकाच व्यासपीठावर येऊ शकतात. शिक्षण हेच समाज बदलाचे प्रभावी माध्यम आहे. म्हणून त्यावर मूल्याधारित शिक्षण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे. संधी खूप आहेत. त्याचा उपयोग ग्रामीण भागापर्यंत करून दिला गेला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
तर कृतीशील शिक्षक भाऊसाहेब चासकर म्हणाले, कोरोना संकटामुळे सर्व शाळा ऑनलाइन सुरू आहेत. मात्र, आदिवासी भागात वाडी-वस्तीवर आजही रेंज (नेटवर्क) उपलब्ध नसल्याने किंवा अत्याधुनिक साधने उपलब्ध नसल्याने अनेक मुले शिक्षणापासून वंचित आहे. यासाठी ही शिक्षणाची गंगा आदिवासीच्या वाडी-वस्ती पर्यंत देण्यासाठी अधिक काम केले पाहिजे.
आमदार डॉ. तांबे म्हणाले, कोणत्याही शासनाचा शिक्षणावर जास्त खर्च होणे अपेक्षित आहे. मात्र, सध्या तसा तो होत नाही. शिक्षणामुळे व्यवस्थेतील गरीब आणि श्रीमंत असे दोन स्तर कमी होतील. सध्या इंग्रजी माध्यमांकडे वाढणारा कल हा जास्त आहे. मात्र, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रभावी इंग्रजीचे शिक्षण मिळाले तर ते चांगल्या प्रकारे यशस्वी होऊ शकतात असेही ते म्हणाले.