मुंबई - अकाली पावसाने झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी शेतकऱ्यांना हेक्टरी 8 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. हिशोब करता शेतकऱ्यांना गुंठ्याला यानुसार केवळ 80 रुपये मदत मिळणार आहे. बागायती पिकांना गुंठ्याला केवळ 180 रुपये मदत देण्याचे जाहीर करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच हा प्रकार आहे.
आज कांद्याच्या रोपाच्या एका वाफ्याचा दर पाच हजार रुपये झाला आहे. बागायती पिकांचा उत्पादन खर्च तर प्रचंड आहे. अशा पार्श्वभूमीवर 80 रुपयात किंवा 180 रुपयात, नुकसान झालेल्या पिकांची भरपाई तर सोडाच, गुंठ्याला लागणारा साधा बियाणांचा खर्च सुध्दा भागणार नाही हे वास्तव आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करायला आलेल्या विविध पक्षाच्या नेत्यांना, शेतकऱ्यांसाठी जाहीर झालेली ही मदत मान्य आहे, का असा सवाल किसान सभा उपस्थित करत आहे. शेतकऱ्यांच्या संयमाची अधिक परीक्षा पाहू नका, शेतकरी मायबापाचा अधिक तळतळाट घेऊ नका. जाहीर केलेल्या या तुटपुंज्या भरपाईचा तातडीने पुनर्विचार करा आणि एकरी किमान 25 हजार रुपयांची सरसकट प्राथमिक मदत शेतकऱ्यांना जाहीर करा, अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेचे डॉ. अजित नवले यांनी केली आहे.