अहमदनगर - निवडणुकीपूर्वी राज्य सरकारला अर्थसंकल्पात संपूर्ण कर्जमाफीसाठी तरतूद करण्याची सोन्यासारखी संधी आहे. मात्र, राज्य सरकारने ही संधी साधली नाही तर शेतकऱ्यांची पोरं निवडणुकीत सरकारच मातेरं केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी दिला आहे.
अहमदनगरमध्ये पॉलिहाऊस शेडनेट धारक शेतकऱ्यांची राज्यस्तरीय परिषद पार पडली. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. किसान सभेच्यावतीने येत्या २० फेब्रुवारीला नाशिक ते मुंबईपर्यंत शेतकऱ्यांचा एक लाँगमार्च काढण्यात येत आहे. यामध्ये किमान १ लाख शेतकरी एकत्रित सहभागी होतील, असा दावा डॉ. नवले यांनी व्यक्त केला आहे. सरकारने यापूर्वी काढलेल्या लाँगमार्चच्या वेळी दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. त्यामुळे आता निवडणुकीपूर्वी सरकारला अर्थसंकल्पाच्या निमित्ताने एक संधी असून संपूर्ण कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांची पूर्तता करण्यासाठी अर्थसंकल्पात सरकार पुरेशी तरतूद करू शकते, असे ते म्हणाले.
पुढे नवले म्हणाले, की अर्थसंकल्पाच्या निमित्ताने मिळणाऱ्या या संधीचे सरकारने सोने करावे ही अपेक्षा आहे. त्यासाठीच सरकारवर दबाव वाढवण्यासाठी २० फेब्रुवारीपासून निघणाऱ्या लाँगमार्चचे नियोजन केले आहे. मात्र, सरकारने संपूर्ण कर्जमाफीसाठी तरतूद न करता या संधीचे सोने नाही केले, तर येत्या निवडणुकात शेतकऱ्यांची मुले सरकारचे मातेरं केल्याशिवाय राहणार नाहीत, असे डॉ. नवले म्हणाले.