अहमदनगर : बिरोबाच्या यात्रेत भाविक मोठ्या भक्तीभावाने सहभागी होतात. यावेळी भाविक डोक्यावर लाल निखाऱ्याची घागर घेऊन त्यातून निघणाऱ्या तप्त ज्वालांसह मंदिराला प्रदक्षिणा मारतात. ही दृश्य पाहताना मात्र अंगावर काटा येतो. अहमदनगरमधील कौठेवाडी गावात भरणाऱ्या बिरोबाच्या यात्रेत हे दृश्य पाहण्यास मिळते. ही यात्रा कठ्याची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. डोक्यावर लाल निखाऱ्याची तेवत असलेली मातीची घागर घेऊन भाविकांनी बिरोबाच्या मंदिराला फेरा मारण्याची प्रथा शेकडो वर्षापासून चालत आली आहे.
काय आहे बिरोबाच्या यात्रेतील कठ्याची परंपरा : कठा म्हणजे बुडाच्या बाजूने कापलेली मातीची घागर असते. कापलेला भाग या घागरीत आतल्या बाजूला उघडा करून ठेवला जातो. त्यात खैराची ढणढणत्या पेटणाऱ्या झाडांची लाकडे उभी केली जातात. त्यात कापूस टाकत ती बाहेरच्या बाजूने नवीन कोऱ्या कपड्याने त्याला घट्ट बांधाली जातात. त्याला फुलांचा हार तसेच इतर आकर्षक सजावट करुन मंदीरासमोर हे कठे ठेवले जातात. दर्शनसाठी आलेले अनेक भाविक या कठ्यांवर थोडे थोडे तेल टाकत राहातात. त्यानंतर साकीरवाडी गावाला मान असलेली काठी मंदिरात रात्री नऊला पोहोचल्यानंतर हे कठे पेटवले जातात. हे पेटलेले आणि आग ओकाणारे धगधगणारे कठे डोक्यावर घेऊन हुई हुईचा आवाज करत भक्तगण मध्यरात्रीपर्यंत बिरोबाच्या मंदिराला फेऱ्या मारतात.
नवस पुर्तीसाठी डोक्यावर धरतात कठा : कठा घेतलेला भक्त खाली गुडघ्यावर वाकला की त्या धगधगत्या कठ्यात त्याचा साथीदार तेल टाकतो. तर एक साथीदार कठ्यातील कठा धरतो. हा सगळा थरार रात्री बारा वाजतापर्यंत चालत असतो. कठ्यातील निखाऱ्याने अथवा तप्त तेलाने एखाद्या भाविकालाही इजा होत नाही. यात काही अंधश्रद्धा नसून केलेला नवस पूर्ण झाल्यावर नवस पुर्तीसाठी कठा तयार केला जातो. तसेच आगीची घागर डोक्यावर घेणाऱ्या भक्तांच्या अंगात बिरोबाचा संचार झालेला असतो, अशी भाविकांची धारणा आहे.
मोगलांच्या काळातील आहे बिरोबा देवस्थान : ही पंरपरा कधी सुरू झाली याच्या अनेक अख्यायिका सांगितल्या जातात. त्यातील एक मोगल कालिनही आहे. बिरोबा देवस्थान मोगलांच्या काळातील असल्याचे वृद्ध नागरिक सांगतात. शिवनेरी किल्ल्यावर हल्ला झाला, तेव्हा नागरिक सैरावैरा पळू लागले. तेव्हा काही नागरिक कौठेवाडी येथे आले. येताना या नागरिकांनी येताना दगडरुपी देव घेऊन आले. नंतर सर्व शांत झाल्यावर ते पुन्हा जावू लागले,तेव्हा लहानसा दगड काही केल्या हलेना. तेव्हा हा प्रांत जहागिरी होता. येथील जहागिरदाराने भोईर आणि भांगरे यांना येथे कसण्यास जमीन देवून येथेच स्थायिक होण्यास सांगितले. तेव्हापासून आम्ही येथे बिरोबाची पूजा करत असल्याचे येथील नागरिकांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात सुरू आहे कठ्याची परंपरा : पुरातन काळात काही धनगर समाजाची लोक डोंगरात मेंढर चारण्यासाठी घेवून आली होती. तेव्हा त्यांच्यावर आलेल संकट बिरोबाच्या नवसाने दूर झाले आणि ते भयमुक्त झाले. तेव्हापासून ही महाराष्ट्रातील कठ्याची परंपरा सुरू आहे. आज मुंबई, ठाण्यांसह अनेक जिल्ह्यातून भाविक या यात्रेसाठी येतात. बिरोबाला नवस करतात आणि पूर्ण झाल्यावर नवसपुर्तीसाठी कठा अर्पण करतात.
हेही वाचा - Exotic Vegetables In Kashmir : काश्मीरच्या नंदनवनात शेतकऱ्याने पीकवला विदेशी भाजीपाला, महिन्याला कमवतात लाखो रुपये