शिर्डी - साईबाबा संस्थानच्या वतीने शनिवार 4 जुलै ते सोमवार 6 जुलै 2020 या कालावधीत गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवात 79 लाख 36 हजार 549 रुपये इतकी देणगी भाविकांनी दिल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.
यावर्षी देश व राज्यावर आलेल्या कोरोना व्हायरसच्या संकटामुळे प्रतिबंधात्मक उपायांसाठी शासनाच्या वतीने लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे 17 मार्चपासून साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलेले आहे. शनिवार 4 जुलै 2020 ते सोमवार दिनांक 6 जुलै 2020 या कालावधीत गुरुपौर्णिमा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. या गुरुपौर्णिमा उत्सवामध्ये रुपये 79 लाख 36 हजार 549 रुपये देणगी प्राप्त झाली आहे. यामध्ये साईबाबा मंदिराचे 4 नंबर गेट जवळील देणगी काऊंटरवर 1 लाख 18 हजार 387 रुपये भाविकांनी देणगी दिले आहेत.
सध्या लॉकडाउन आणि भाविकांना दर्शानासाठी साई मंदिर बंद ठेवण्यात आल्याने काही भाविकांनी घरबसल्या आपल्या साईंना देणगी दिली आहे. डेबीट-क्रेडीट कार्ड, चेक-डीडी, मनी ऑर्डर देणगीव्दारे रुपये 10 लाख 63 हजार 389 रुपये तसेच ऑनलाईन देणगीव्दारे 67 लाख 54 हजार 773 रुपये आदीचा समावेश आहे.
मागील वर्षी श्री गुरुपौर्णिमा उत्सवामध्ये एकूण रुपये 4 कोटी 52 लाख देणगी प्राप्त झाली होती. व मागील उत्सवाच्या कालावधीत 1 लाख 86 हजार 783 साईभक्तांनी साई दर्शनाचा लाभ घेतल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.