अहमदनगर - सोशल मीडियावर भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ.सुजय विखे पाटील यांच्यासह पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या विरोधात अक्षेपार्ह आणि बदनामीकारक मजकूर प्रसारीत केल्यासंदर्भात संबधितांवर सायबर क्राईम विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. विखे यांच्या विरोधात बदनामीकारक पोस्ट टाकणाऱ्यांचे मोबाईल नंबर देण्यात आले असून बदनामीकारक मजकूरही लोणी पोलीसांच्या निदर्शनास आणून देण्यात आला आहे.
हेही वाचा - खासदार विखेंचा नुकसान पाहणी दौरा, शिवसेनेचे माजी आमदार औटी अनुपस्थित
बाजार समितीचे सभापती बापूसाहेब आहेर, विजय सिताराम लगड यांनी विखे पाटील कुटुंबीयांची बदनामी केल्याचा आणि डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची कोणतीही शहानिशा न करता दिशाभुल करणारा मजकुर प्रसारीत केल्याचा आरोप करत प्रशांत म्हस्के यांनी तक्रार दिली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार म्हणून विखे पिता-पुत्र मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या लोकप्रियतेची असूया असलेल्या काही लोकांनी जाणीवपूर्वक त्यांची बदनामी करणारा मजकूर सोशल मीडियात प्रसारित केल्याचे आरोपकर्त्यांचे म्हणणे आहे.