अहमदनगर - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी शिर्डीतील भाजी मंडईत भाजी बाजार भरवण्यात येत नव्हता. मात्र, शिर्डी नगरपंचायतीने बाजारतळात भाजी विक्रेत्यांना एकत्रित विक्रीसाठी बसवल्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा पार बोजवारा उडाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य अंतर पाळले जात नसवल्याने सदर भाजी मार्केटची विभागणी चार ठिकाणी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजीपाला विक्री ही यापूर्वी प्रत्येक वार्डात वेगवेगळ्या ठिकाणी अंतरा-अंतरावर होत होती. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्यात थोडी मदत होत होती. मात्र शिर्डी शहरात आता एकाच ठिकाणी भाजीपाला विक्री करण्याचे विक्रेत्यांना सांगण्यात आले आहे. शहरातील सर्वांना आता काही अंतर गाठून बाजारतळावर भाजीपाला खरेदी विक्री करावी लागते. त्यामुळे येथे सर्व भाजीपाला विक्रेते आणि ग्राहक एकत्र येत असल्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्याचे दिसत आहे.
हेही वाचा - राज्याचा बारावीचा निकाल: बापरे..! २५ विषयांचा निकाल १०० टक्के
शहरातील रिक्षा बंद असल्यामुळे दोन-तीन किलोमीटर परिसरातील महिलांना बाजारतळात भाजी घेण्यासाठी पायी यावे लागते. त्यामुळे नगरपंचायतीने घेतलेला हा निर्णय त्वरित मागे घेऊन पूर्वीसारखा प्रत्येक वार्डात भाजीपाला विक्रेत्यांना बसवण्यात यावे, अशी मागणी शहरातील नागरिक करत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नगरपंचायतीमार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, काही निर्णय हे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश डावलुन होत आहेत. शिर्डीत यापूर्वी प्रत्येक वार्डात वेगवेगळ्या ठिकाणी भाजीपाला विक्रेते विक्रीसाठी बसत होतेय त्यामुळे त्या नगरातील महिलांना आपल्याजवळील भाजीपाला विक्रेत्याकडून भाजी घेणे सोपे जात होते. तसेच कोरोनाचा धोकाही कमी वाटत होता. मात्र, आता चिंता अधिक वाढली आहे.