अहमदनगर- जानेवारी महिन्यात एका व्यक्तीने फेसबुकवर जामखेड येथील एका शिक्षिकेशी ओळख केल्यानंतर तिला धमकावून तिच्याकडून चक्क २१ लाख ४१ हजार उकळले होते. या व्यक्तीस अहमदनगरच्या सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने जेरबंद केले आहे. स्वराज्य मणिकुमार राय असे अटक केलेल्या सायबर गुन्हेगाराचे नाव असून तो दिल्लीत वास्तव्यास होता.
यु.के मधल्या डॉ. मार्क हॅरल्युके नावाने स्वराज्य रायने जामखेड येथील शिक्षिकेला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून तिच्याशी ओळख वाढवली. शिक्षिकेच्या मुलासाठी मोबाईल आणि लॅपटॉप भेट म्हणून पाठवल्याचे सांगत आरोपीने नंतर आपल्या महिला साथीदाराला कस्टम अधिकारी असल्याचे भासवून फोनवर शिक्षिकेला आपल्या नावे ५० हजार पौंड स्कॅन झाल्याचे सांगत घाबरवून सोडले. गुन्हा दाखल न होण्यासाठी आणि कस्टमचा दंड म्हणून शिक्षिकेने तोतया महिला कस्टम अधिकारी सांगेल त्या खात्यात तब्बल २१ लाख ४१ हजार रुपये भरले होते. याबाबत शिक्षिकेच्या तक्रारीवरून अहमदनगरच्या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर पोलिसांनी फेसबुक, मोबाईल, बँक खात्यांचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपी स्वराज्य मणिपूर राय याचा माग काढला आणि त्याला दिल्ली येथून अटक करून नगरला आणले. आरोपीला न्यायालयाने १७ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. या गुन्ह्यातील तोतया कस्टम अधिकारी महिला मात्र, अद्याप फरार आहे.
हेही वाचा- 'वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या इंदोरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल करा'