शिर्डी - कावळा हौसेने पाळीला । परि हा जातीवरी गेला ।। खाऊनिया दुध भात । चोच उडवी थरकाप ।। अशी जगाची हो रीत । जशी कावळ्याची जात ।। कावळा तसा हिंस्र पक्षी असूनही माणसांच्या सहवासात राहणारा आहे. कावळ्यावर संकटे आले की ते माणासालाही त्रास देतात. याचा प्रत्यय तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगातून मांडलेला आहे. असाच काहीसा प्रकार शिर्डी येथे घडला आहे. ही बातमी ऐकूण आपला विश्वास बसणार नाही, पण ही घटना सत्य आहे.
कावळ्यांची दहशत -
शिर्डी शहरातील हॉटेल व्यावसायिक प्रकाश जयराम शेळके हे त्यांच्या शिर्डी पिंपळवाडी रोडवरील फार्म हाऊसमध्ये कुटूंबियांसह वास्तव्यास आहेत. त्यांच्या घराशेजारी लिंबाचे झाड आहे. या झाडावर कावळ्याचे घरटे होते. त्यातील कावळ्याचे एक पिल्लू घरासमोर खाली पडले. त्याला उडता येत नसल्याने पिल्लाच्या रक्षणासाठी कावळ्याने तेथे २४ तास पहारा ठेवून, शेळके कुटूंबियास जेरीस आणले. त्यांचे घराबाहेर पडणेदेखील बंद केले.
हेही वाचा - थेट मंत्रालयातच 'चिअर्स'! दारूच्या बाटल्या सापडल्या, विरोधक आक्रमक
घराच्या बाहेर कोणी सदस्य पडला की कावळे त्याच्या डोक्यावरती घिरट्या घालत, चोच मारुन पिटाळून लावतात. हा प्रकार माणसांखेरीज कुत्रे, मांजर व अन्य पक्षांच्या बाबतीतही चालू आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून शेळके कुटूंबीय कावळ्याच्या या अघोषित संचारबंदीने पुरते जेरीस आले. कावळ्याच्या पिलाला पाणी पाजणे, भात वगैर खाऊ घालणे आदी सोपस्कर करुनही कावळे शेळके कुटूंबियांस बाहेर पडू देत नाहीत. कुत्रे, मांजर चुकुन या कक्षेत आल्यास कावळे त्यांच्यावरही ह्ल्ला करुन त्यांना पिटाळून लावतात. कावळ्यांच्या कर्कश आवाजाने शेळके कुटूंबिय पुरते हैराण झाले आहे.
प्रकाश शेळके हे पहाटे फिरण्यास जात असतात. पण, कावळ्यांनी पिल्लांच्या रक्षणार्थ सुरू केलेल्या सुरक्षा कक्षेमुळे त्यांना बाहेर पडणे जिकरीचे झाले आहे. शेळके यांनी एक नामी शक्कल लढवली आहे. बाहेर पडतेवेळी ते काठीला वॅक्स पाण (करवतीचे पात) लावून ती उंच धरुन बाहेर पडतात. तरी पण कावळे त्यांचा पाठलाग करतात. काव...काव...आवाज करुन घिरट्या घालत त्यांना पिटाळून लावतात. कावळ्यांनी शेळके यांचे फार्म हाऊस व परिसरात संचारबंदी केली आहे. अनेक संकटे आली, त्यांना समर्थपणे सामोरे गेलो. पण कावळ्यांच्या या संचारबंदीमुळे मी तर हैराण झालोच, पण गेल्या पाच-सहा दिवसांपासून या भागात कुत्रे, मांजरेही फिरकत नाहीत. इतकी या कावळ्यांची दहशत असल्याची प्रतिक्रिया प्रकाश शेळके यांनी दिली.
हेही वाचा - विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! 17 ऑगस्टपासून शाळा सुरु, शासन आदेश जारी