शेवगाव (अहमदनगर) - गेल्या अनेक दिवसांपासून शेवगाव तालुका आणि परिसरात युरिया खताची टंचाई होती. शेवगावचे कृषी अधिकारी किरण मोरे व राहुल कदम यांनी शेवगाव तालुक्यातसाठी खत मिळवून दिले. मात्र, शेतकऱ्यांनी खत खरेदीसाठी कृषी दुकानात मोठी गर्दी केली होती.
सोमवारी युरिया खत आला असल्याची माहिती मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी कृषी दुकानात गर्दी केली. फिजिकल डिस्टन्सच्या नियमाची याठिकाणी पायमल्ली करण्यात आली. नगरपरिषद पोलीस महसूल प्रशासन यांनीही याकडे दुर्लक्ष केले आहे.
शेतकऱ्यांनी खतासाठी गर्दी करू नये, सगळ्यांना मुबलक प्रमाणात खत मिळणार आहे. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये आणखी मोठ्या प्रमाणावर शेवगाव तालुक्यासाठी खत उपलब्ध होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी गर्दी टाळावी, असे कृषी अधिकारी किरण मोरे यांनी सांगितले.