अहमदनगर - लोक एकमेकांच्या संपर्कात येऊ नये आणि कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी सरकारने संचारबंदीचा निर्णय घेतलेला आहे. मात्र नगरमध्ये त्याला हरताळ फासला जात आहे. नगर तालुका बाजार समिती आवारात जिल्ह्यातून शेतकऱ्यांनी आणलेल्या भाज्यांवर नगरकर अक्षरशः शेकडो-हजारोच्या संख्येने तुटून पडले आहेत.
सरकार वारंवार गर्दी न करता घरी राहण्याचे आवाहन करत आहे. मात्र, लोकांना याचे कसलेही गंभीर्य नाही. ठोक आणि किरकोळ व्यापाऱ्यांबरोबरच सामान्य नागरिक सकाळपासूनच भाजीपाला खरेदीसाठी मोठ्या संख्येने एकत्र आल्याने प्रचंड गर्दी याठिकाणी दिसून आली. काही जागरूक नागरिकांनी प्रशासनाला याची माहिती दिली. परंतू, याची कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे उशिरापर्यंत हा बाजार सुरू होता.
हेही वाचा - कोरोनामुळे आंबेगावमधील आहुपे गावात 'नो एन्ट्री'; येण्याजाण्याचे रस्ते बंद
संचारबंदी तसेच लॉकडाऊनच्या आदेशातून भाजीपाला, दूध, किराणा सामान, मेडिकल दुकाने यासारख्या अत्यावश्यक सुविधा वगळण्यात आल्या आहेत. मात्र, स्वस्तात आणि मुबलक प्रमाणात भाजीपाला मिळतो, म्हणून लोक भाजी मंडईत जाऊन खरेदी करत आहेत. अशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो हेच नागरिक विसरत आहेत.
हेही वाचा - घराबाहेर पडू नका, नितीन गडकरींचे जनतेला आवाहन