अहमदनगर - संगमनेर तालुक्यात मुसळधार पावसाने चांगलाच हाहाकार घातला. शेतीचे बांधही पाण्याने वाहून गेले. शेत शिवारातून नदी नाल्यासारखे पाणी वाहू लागल्याने शेतकऱ्यांची पिकेही पाण्याखाली गेली. तर ओढे, नाले, सिमेंट बंधारे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी काही भागात शेतपिकांचे मोठे नुकसानही झाले आहे.
शुक्रवारी सायंकाळी संगमनेर शहरासह तालुक्याच्या पठार भागात पावसाने हाहाकार माजवला. ढगफुटीसारखी परिस्थिती झाल्याचे नागरीक सांगत आहेत. जवळपास १ ते २ तास चालणाऱ्या मुसळधार पावसाने शेतशिवारात सगळीकडे पाणीच पाणी केले.
पठारभागावरील पिंपळगाव देपा, खंडेरायवाडी, मोधळवाडी, वरूडी पठार, सारोळे पठार, ढोरवाडी, सावरगाव घुले, जवळे बाळेश्वर, खंदरमाळवाडी, माहुली, घारगाव, चंदनापुरी हिवरगाव पावसा बोटा, माळवाडी याही भागात पावसाने दाणादाण उडाली. संपूर्ण पिके पाण्याखाली गेली आहेत. शेतामधून पाणीच पाणी भरल्याने मका आणि ज्वारी पिके जमिनीवर आडवी झाली. पावसाने काही काळ विश्रांती घेतली नाही तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.