अहमदनगर(कोपरगाव) - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन आणि प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. अहमदनगरच्या कोपरगाव येथील एस.एस.जी.एम. महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहात १०० बेडचे कोविड केअर सेंटर सज्ज करण्यात आले आहे. आमदार आशुतोष काळे यांनी याबाबत माहिती दिली.
काही दिवसांपूर्वी कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर परिसरात साठ वर्षीय महिलेचे कोरोना संसर्गाने निधन झाले. शिंगणापूर येथील एका महिलेचे सारी(Severe Acute Respiratory Illness) सदृष्य आजाराने निधन झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्यावतीने कडक उपाय योजना करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे. लॉकडाऊन काळात सर्दी, खोकला, ताप अशा रुग्णांसाठी आशुतोष काळे यांनी फोनच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टरांचा मोफत वैद्यकीय सल्ला तसेच गरजू रुग्णांसाठी कम्युनिटी क्लिनिक सुरू केले आहे.
यामुळे शेकडो रुग्णांना लॉकडाऊनच्या काळात नियमितपणे वैद्यकीय सेवा मिळत आहे. प्रशासनाच्यावतीने खबरदारी म्हणून सर्दी, खोकला, ताप, दमा आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल अशा रुग्णांना भरती करून उपचार करण्यासाठी एस.एस.जी.एम. महाविद्यायातील मुलींच्या वसतिगृहात १०० बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. या कोविड केअर सेंटरमध्यर खासगी आणि सरकारी डॉक्टर या रुग्णांवर उपचार करणार आहेत. वरिष्ठ स्तरावरून परवानगी मिळताच हे कोविड केअर सेंटर सुरू होणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले.
तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौन्दर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधाटे, कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, शहर पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर, ग्रामीण पोलीस निरीक्षक अनिल कटके अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता आपल्या घरातच बसून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आशुतोष काळे यांनी केले.