अहमदनगर - जिल्ह्यात आढळलेल्या दुसऱ्या कोरोनाबाधित रुग्णाचा १४ दिवसानंतरचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. यानंतर आरोग्य यंत्रणेने समाधान व्यक्त केले. आज पुन्हा टेस्ट घेतली जाणार असून आजचाही अहवाल निगेटिव्ह आल्यास या रुग्णाला शनिवारी डिस्चार्ज मिळणार आहे.
हा रुग्ण नेवासे तालुक्यातील असून तो दुबईहून प्रवास करून आलेला होता. भारतात परतल्यानंतर प्राथमिक लक्षणे आढळल्याने घेतलेल्या स्त्राव चाचणीत तो कोरोना पॉझिटीव्ह आला होता. १९ मार्चपासून त्याच्यावर नगरमधील बूथ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. यानंतर २ एप्रिलला १४ दिवसानंतर केलेल्या त्याच्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
यापूर्वी १२ मार्च रोजी दाखल झालेल्या पहिल्या रुग्णाचे १४ दिवसानंतरचे दोनही स्त्राव अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर २८ मार्चला त्याला घरी सोडण्यात आलेले आहे. सध्या जिल्ह्यातील कोरोनाबधितांचा आकडा १७ आहे. त्यातील एकाला डिस्चार्ज देण्यात आल्याने १६ रुग्णांवर आयसोलेशन कक्षात उपचार सुरू आहेत. शनिवारी ही संख्या १५ होऊ शकते.